

Anil Gote vs Anup Agarwal
धुळे : धुळेकरांच्या हितासाठी आणि गुंडगिरी, दादागिरी, दडपशाही विरुद्ध रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करणारच, मग तुम्ही बोटे छाटा, नाहीतर मुंडी छाटा, आमची सर्व तयारी आहे, आमचा विकास कामाला विरोध नाही. विकास कामाच्या नावावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला विरोध आहे आणि तो राहणारच, अशा शब्दांत माजी आमदार अनिल गोटे आणि माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर टीका केली आहे.
शहरातील पाच कंदील चौकातील कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या टीकेला आता माजी आमदार अनिल गोटे आणि माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी उत्तर दिले आहे.
शहरातील पाच कंदील चौकातील लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केट पाडले गेले. यावरून माजी आमदार गोटे यांनी महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी भाजपा गट आणि आमदार अग्रवाल यांच्यावर टीकेची जोड उठवली आहे. पाच कंदील चौकातील मार्केटच्या नियोजित बांधकामाचा नकाशा तुम्ही अजूनही मंजुरीला टाकलेला नाही. बांधकामाची परवानगी घेतलेली नाही. मार्केटमधील दुकानदाराकडे आजमितीस त्यांची किती जागा आहे?, बदल्यात त्यांना किती जागा, कुठल्या दराने देणार? प्रतिज्ञापत्रावर गाळे धारकांना लिहून द्या. जे काही बांधकाम करणार आहात त्याला शासन मान्यता घ्या. राज्याच्या चिफ आर्किटेक्ट करुन डिझाइन मंजूर करुन आणा. असे गोटे यांनी सुचवले आहे.
या मार्केटच्या पुनर्निर्मानाचा विषय यापूर्वी आमच्यासमोर आला होता. त्यावेळी आम्ही दुकाने फुकट बांधून देणार होतो. तुम्ही फुकट देणार आहात का?, आज असलेल्या व्यावसायीकांबरोबर कुठलाही करार न करताच दंडेलीने कामे करणे हे खपवून घेणार नाही.
सर्वप्रथम गाळेधारकांसोबत कायदेशीर करार करा. करारास शासनाच्या "लॉ अॅन्ड ज्युडीशिअल" विभागाची मान्यता घ्या, चंद्र सुर्य असे पर्यंत जागेची मालकी पालिकेचीच राहील की पुन्हा आर. आर. पाटील मार्केट, आणि छत्रपती शिवाजी महाराज मार्केट प्रमाणे त्या जागा ठेकेदाराच्या नावावर करणार आहात?, याचा खुलासा झालाच पाहीजे.
विकासाच्या नावावर जागा गिळंकृत करण्याचे नवीन कटकारस्थान शिजत असल्याचा आम्हाला रास्त संशय आहे. शेकडो कोटींची जागा, ठेकेदाराला पुढे करून, आपसात किती लोकांनी वाटप करुन घेण्याचे ठरवले आहे? याचा खुलासा झाल्याशिवाय सुरु केलेले काम बेकायदेशीर, नियमबाह्य असेल म्हणूनच त्या ठिकाणी काम सुरू करण्यापूर्वी याचा खुलासा धुळेकर जनतेला व दुकानदारांना झाला पाहिजे.
ते दुकानदार, तुमच्या पाळीव गुंडांच्या टोळ्यांच्या धमक्यांना घाबरून गप्प आहेत. याचा अर्थ ते समाधानी आहेत असा नव्हे, ते आमच्याकडे येऊन तुमच्या गुंडगिरीच्या, दडपशाही व दादागिरीच्या घटना साश्रूपूर्ण नयनांनी सांगत असतात. 'कुठलेही पद नसताना, आपल्याला, आमच्याकडूनच न्याय मिळेल हा लोकांमध्ये टिकून असलेला विश्वास' आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान देतो. असा टोला देखील गोटे यांनी लगावला आहे.