

धुळे : पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःच्या खाजगी संपत्तीतून निर्माण केलेले शतकानुशतके टिकणारे बांधकाम, भाजपाकडून हेतूतः, कट कारस्थान करून जमीनदोस्त करण्याचे सरकारचे अतिशय निंदणीय कृत्य आहे. आपण वय आणि असाध्य आजाराने हतबल झालो आहे. अन्यथा तेथे जाऊन अन्यायी प्रवृत्तीला विरोध केला असता. पण धनगर समाजाने आता तरी जागे होऊन होळकर घराण्याचा इतिहास पुसून टाकण्याचा कारस्थाना विरोधात उभे राहिले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यातून केले आहे.
हिंदुत्वाच्या नावावर देशबांधवांना मूर्ख बनवून, विकासाच्या नावावर हजारो वर्षांपूर्वीची हिंदूंची मंदिरे व श्रद्धास्थाने जमीनदोस्त करण्याचा धडाका स्वतःला हिंदू रक्षक म्हणून घेणाऱ्या सरकारने लावला आहे. मोघल आणि परदेशी आक्रांतांना जे करण्याचे धाडस झालेले नाही, किंवा दिडशे वर्षे राज्य करून इंग्रजांना जे करता आले नाही, असे हिंदू धर्मियांना लांच्छित करणारे कुकर्म भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे, असा आरोप माझी आमदार गोटे यांनी केला आहे.
उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ज्या मातेने हिंदू धर्माचे दैवत असलेले घाट बांधले, मंदिरे उभारली, धर्मशाळा बांधल्या ,यासाठी लागणारा सर्व खर्च स्वतःच्या खाजगी तिजोरीतून केला. सरकारी तिजोरीवर एक पैशाचा भर पडू दिला नाही. अशा माता अहिल्यादेवी होळकरांची सर्व धार्मिक स्थाने जमीनदोस्त करून, होळकरांचा इतिहासच पुसून टाकण्याचे कारस्थान भाजपाचे राज्यकर्ते करीत आहेत. खरे तर या वयात व असाध्य आजारामुळे मी जवळजवळ हतबल झालो आहे. अन्यथा मी स्वतः तिथे जाऊन आंदोलन केले असते. धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर गुंतवून, विकलांग करून ठेवले आहे. अशी टीका देखील गोटे यांनी केली आहे. अशी घटना अन्य समाज धुरीणांच्या संबंधात घडली असती तर आतापर्यंत सगळा देश पेटून उठला असता. परंतु नुसते मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांचा पराक्रम सांगून, स्वतःचे समाधान करून घेणाऱ्या धनगरांच्या नेत्यांनी या पराक्रमी समाजाला लाचार करून ठेवले आहे. ही वस्तुस्थिती कितीही नाकारली तरी सुद्धा खरी आहे.
भाजपावाले केवळ नेहरु गांधींना विरोध करतात असे नाही तर स्वातंत्र्याच्या चळवळीत इंग्रजाचे खबरे असलेले आणि ब्रिटीशांचे लांगुलचालन करणाऱ्यांची ही जमात भारताचा जाज्वल्य इतिहासच नष्ट करून पुसून टाकीत आहे. अशा कारस्थानाचा एक भाग आहे. आर.एस.एस. च्या कार्यालयासमोरील १५०० वर्ष जुने मंदिर पाडतांना भगवान शंकराच्या व बजरंग बलीच्या गळ्यात साखळदंड अडकवून दीड हजार वर्षे पुजन केलेल्या मुर्त्यां उखडून टाकल्या. याबाबत हिंदुंची प्रतिक्रिया शुन्य असल्याचे पाहून आता कॉरिडॉरच्या नावावर पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींनी निर्माण केलेले ऐतिहासिक व स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ उदाहरण असलेले मंदिर व मनकर्णिका घाटच उध्वस्त करून टाकले आहे.
ज्या समाजाला आपल्या जाज्वल्य इतिहासाचा विसर पडतो, तो समाज वेगाने लाचारीकडे मार्गक्रमण करतो. दुदैवाने आमच्या धनगर समाजाची अशी अवस्था झाली आहे. पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींची राजधानी असलेले 'महेश्वर' ताब्यात घेण्यासाठी दहा हजाराच्या फौजेसह आलेल्या राघोबादादांना 'उदईक येणार असाल तर आजच या' असे आव्हान देणाऱ्या पुण्यश्लोक मातेचा वारसा सांगणारा हाच समाज आहे का? असा सवालही गोटे यांनी विचारला आहे.
आतापर्यंत धनगरांनी रस्त्यावर उतरून भाजपा सरकारला आपले दैवत असलेल्या अहिल्यादेवींच्या प्रति एकनिष्ठता दाखविण्याची आवश्यकता होती. कुणाला पटो अथवा न पटो, स्वतःला धनगरांचे नेते म्हणून घेणाऱ्या सर्व धनगरांनो, आता तरी जागे व्हा,प्राणपणापासून माता अहिल्यादेवींचे कर्तृत्वस्थान असलेल्या पवित्र स्थळांच्या समर्थनार्थ खंबीरपणे रस्त्यावर उतरा, किती वर्ष सत्तारूढ पक्षाची लाचारी कराल, असा खडा सवाल आपल्याच समाज बांधवांना अनिल गोटे यांनी विचारला आहे.