धुळे : पुढारी वृत्तसेवा- लोखंडी पावडी डोक्यात घालून पत्नीचा खून करणाऱ्या एकास जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश डी. एल. भागवत यांनी आज ठोठावली आहे. सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांनी सादर केलेले साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे पाहता न्यायालयाने या आरोपीला शिक्षा सुनावून त्याची तुरुंगात रवानगी केली.
धुळे शहरातील चक्करबर्डी परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामाच्या साइटवर ६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजेला सांजिली सुरेंद्र सोरेन या महिलेचा मृतदेह आढळला. सांजिली आणि तिचे पती सुरेंद्र बारकू सोरेन उर्फ चंद्राई लक्ष्मीनारायण मुरमु हे 5 सप्टेंबर रोजी चक्करबर्डी परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या साइटवर त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते. मात्र रात्री किरकोळ कारणावरून सुरेंद्र सोरेन यांनी कुरापत काढून सांजिली यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने सांजिली यांच्या डोक्यात लोखंडी पावडीने सुरेंद्र याने वार केला. हा वार वर्मी बसल्यामुळे सांजिली यांचा जागीच मृत्यू झाला. पत्रटी खोलीमध्ये हा प्रकार घडल्यामुळे इतर मजूर तातडीने धावून गेले. दरवाजा उघडला असता त्यांना सांजिली यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर सुरेंद्र याच्या डोक्याला देखील लागलेले होते त्यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणात मोहन मुरमु याने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांनी या प्रकरणात चौकशी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश डी. एल. भागवत यांच्यासमोर झाले. या खटल्यात सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांनी सात साक्षीदार तपासले. यात पंच संजय देसले, शवविच्छेदन करणारे डॉक्टर आर के गढरी, अजय हसदा आणि फिर्यादी मोहन मुरमु यांच्या महत्त्वाच्या साक्षी तपासण्यात आल्या. यात डॉक्टर गढरी यांनी मयताच्या अंगावर बारा जखमा असल्याचे कथन केले. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्याची शृंखला न्यायालयात सादर करण्यात आली. या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर सरकार पक्षाने हा गुन्हा सिद्ध करण्यात यश मिळवले. न्यायालयाने सुरेंद्र सोरेन याला खूनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हेही वाचा :