राजधानीत ‘तो राजहंस एक’ नाट्य कलाकृतीचा प्रयोग; शेतकरी तरुणाच्या लग्नाचा उलगडणार जीवनप्रवास

राजधानीत ‘तो राजहंस एक’ नाट्य कलाकृतीचा प्रयोग; शेतकरी तरुणाच्या लग्नाचा उलगडणार जीवनप्रवास
Published on
Updated on
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सामाजिक मानसिक आरोग्यासाठी कलेच्या माध्यमातून जागृती करणारे 'तो राजहंस एक' (Drama : To Rajahans Ek) हे नाटक राजधानी दिल्लीत उद्या (१४ फेब्रुवारी) सादर होणार आहे. तरुण शेतकऱ्यांच्या लग्नाचा महत्वपुर्ण मुद्दा या नाटकाच्या माध्यमातुन मांडला जाणार आहे. महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच या नाटकाचा प्रयोग होत आहे, दिल्लीकर मराठी रसिकांनी हे नाटक बघायला आवर्जून यावे, असे आवाहन नाटकाचे दिग्दर्शक सचिन शिंदे आणि संपूर्ण चमूने केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने या नाट्यप्रयोगाला विशेष करून निमंत्रित करून घेतले. नाटकाच्या पूर्वसंध्येला त्यांनी 'पुढारी'शी दिल्लीत संवाद साधला.
राजधानी दिल्लीत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाद्वारे सुरू असलेल्या भारत रंग महोत्सवात विविध राज्यांची नाटके सादर होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी नाटक 'तो राजहंस एक' सादर होणार आहे. बदलत्या काळासोबत झालेली शेतकरी कुटुंबांची अवस्था, शेतीबद्दल नव्या पिढीमध्ये येत असलेले नैराश्य आणि तरुण शेतकऱ्यांच्या लग्नाचा संवेदनशील मुद्दा या नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजासमोर मांडण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत विविध ठिकाणी या नाटकाचे ३० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. राजधानी दिल्लीच्या निमित्ताने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर या नाटकाचा प्रयोग होत आहे. दरवर्षी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाद्वारे आयोजित या महोत्सवात नाट्यकलाकृती सहभागी करून घेण्यासाठी प्रक्रिया असते. मात्र यावर्षी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने 'तो राजहंस एक' या नाट्यप्रयोगाला स्वतःहून निमंत्रित करून घेतले. त्यावरून नाटकातील मुद्द्याचे गांभीर्यही कळते आणि असा मुद्दा प्रकर्षाने मांडत असल्याचा अभिमान वाटतो, असेही दिग्दर्शक सचिन शिंदे म्हणाले.
अनेकदा माणसाला शारीरिक आजार झाल्यानंतर आपण रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार घेतो. मात्र मानसिक आजार या विषयावर ग्रामीण भागात बोलल्या जात नाही. ग्रामीण भागातील तरुणांच्या शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, तेही मानसिक आजारातून जातात. मात्र त्यांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यावर बोलले पाहिजे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी ते प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत, असा प्रयत्न या माध्यमातून 'तो राजहंस एक' या नाटकाची चमू करत असल्याचे अभिनेत्री आणि या नाटकातील कलाकार अनिता दाते यांनी सांगितले.
तर यंदा हे भारत रंग महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. यात सादर होत असलेल्या नाटकात 'राजहंस'ची भूमिका अत्यंत आव्हानात्मक आहे. ही आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा आनंद आहे. यानिमित्ताने माझ्यासह आमच्या संपुर्ण चमुला राजधानीत आंतरराष्ट्रीय महोत्सवात कलाकृती सादर करायला मिळत आहे, हा मराठी रंगभूमीचा गौरव वाटतो, अशा भावना कलाकार प्राजक्त देशमुख यांनी व्यक्त केल्या.

'तो राजहंस एक' या नाटकाची चमू

दिग्दर्शक- सचिन शिंदे,
लेखक- दत्ता पाटील
कलाकार- प्राजक्त देशमुख, अनिता दाते, अमेय बर्वे, धनंजय गोसावी, हेमंत महाजन
प्रकाशयोजना- प्रणव सपकाळे,
संगीत- रोहित सरोदे
नेपथ्य- चेतन बर्वे,
निर्माते- प्रमोद गायकवाड
निर्मिती व्यवस्था- लक्ष्मण कोकणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news