

धुळे : धुळे जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध तस्करी करून दहशत माजवणाऱ्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या टोळीतील तीन प्रमुख सदस्यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील तिसगाव येथील नितीन रवींद्र पाटील (टोळीप्रमुख), समाधान देविदास पाटील आणि दीपक छोटू पाटील यांनी २०२० पासून एक संघटित टोळी तयार केली होती. ही टोळी अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करत असे. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनरक्षकांना धक्काबुक्की करणे, दहशत निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे आणि दुखापत करणे यांसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
या टोळीमुळे धुळे शहर आणि परिसरातील नागरिकांच्या जीविताला व मालमत्तेला धोका निर्माण झाला होता, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी या तिघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे सादर केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्रस्तावाची सखोल छाननी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी यावर सुनावणी घेतली आणि तिघांनाही सहा महिन्यांसाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी इशारा दिला आहे की, हद्दपारीच्या कालावधीत या तिघांनी पोलीस किंवा शासनाची लेखी परवानगीशिवाय जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १४२ नुसार कारवाई केली जाईल, ज्यामध्ये दोन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, सपोनि सचिन कापडणीस, पोउनि मनोज कचरे तसेच पोलीस अंमलदार संतोष हिरे, हर्षल चौधरी, कबीर शेख व सनी सरदार यांच्या पथकाने केली.