

Shirpur Piloda Grocer Murder Case
धुळे: गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथे घडली आहे. खून करून पसार झालेल्या दोघांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी देवळा येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथे किराणा दुकानदार असणारे गोपालसिंग बाबूसिंग परदेशी (वय 62) हे रात्री घरी एकटेच होते. या संधीचा फायदा घेत गावातीलच आकाश पवन इच्छे याने परदेशी यांच्या घरात जाऊन त्यांच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार केला. हा वार वर्मी बसल्याने परदेशी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इच्छे याने गावातून पलायन केले. ही बाब पहाटे निदर्शनास आल्यामुळे तातडीने थाळणेर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत इच्छे याच्या शोधासाठी पथके रवाना केले.
दरम्यान, नजीकच्या जिल्ह्यामध्ये देखील ऑनलाइन पद्धतीने ही माहिती पाठवण्यात आली. त्यानुसार नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस पथक देखील कार्यरत झाले. याच पथकाने देवळा येथून आकाश पवन इच्छे (भोई) (रा. पिळोदा, तालुका शिरपूर ) व आलोक भास्कर कोळी ( रा. पिळोदा तालुका, शिरपूर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. या दोघाही आरोपींना थाळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता या संदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खूनाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे.