

धुळे : धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगून जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या एका संघटित टोळीला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा आदेश जारी करत, या कालावधीत टोळी सदस्य जिल्ह्यात आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
अवैध शस्त्र बाळगून जबरी चोरी करणारी टोळीमध्ये चेतन जिभाऊ पाटील (रा. भोकर), शेखर दत्तू वाघमोडे (रा. भोकर) आणि विकास संजय केदारे (रा. चाळीसगाव रोड, धुळे) या आरोपींपासून बनलेली होती. त्यांनी 2023 मध्ये पश्चिम देवपूर, आझादनगर, मोहाडीनगर आणि धुळे तालुका पोलिस ठाणे हद्दीत जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन अशा गंभीर गुन्ह्यांची मालिका केली होती.
टोळीच्या कारवायांमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झाल्याने पश्चिम देवपूरचे सपोनि सचिन कापडणीस यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत तडीपारीचा प्रस्ताव मांडला. गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या छाननीनंतर पोलीस अधीक्षकांनी निर्णय घेत तीनही आरोपींना धुळे जिल्ह्यातून तडीपार केले.
जर या टोळीने लेखी पूर्वपरवानगीशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत त्यांच्यावर दोन वर्षांची शिक्षा अथवा दंडाची कारवाई होणार आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.