

Dhule Municipal Corporation Standing Committee
धुळे : धुळे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत स्वीकृत नगरसेवक तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य पदांची नियुक्ती करण्यात आली. या महानगरपालिकेवर भाजपकडून निर्विवाद बहुमत असल्यामुळे या सर्व समित्यांवर नवोदित सदस्यांना संधी मिळाली आहे. विशेषतः अनेक दिग्गज म्हटल्या जाणाऱ्या नगरसेवकांना मात्र या समितीत संधी दिली गेलेली नाही.
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आज महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्याच महासभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ तसेच भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांसह अपक्ष उमेदवार उपस्थित होते. तर माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर यांची सभागृहाची परवानगी घेऊन गैरहजेरी होती.
धुळे महानगरपालिकेची निवडणूक पार पडून अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी रस्सीखेच झाली. अखेर महापौरपदी सौ मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी सौ जोत्स्नाताई पाटील यांची निवड झाली. मात्र स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समितीमध्ये कुणाला संधी मिळते, यासाठी फिल्डिंग लावणे सुरू होते .अखेर आज झालेल्या सभेत भारतीय जनता पार्टीने नवोदित चेहऱ्यांना संधी देऊन दिग्गजांना प्रतीक्षेच्या रांगेत बसवण्याचे चित्र दिसून आले.
स्थायी समितीवर निवडले गेलेल्या भाजपाच्या ११ सदस्यांपैकी ८ चेहरे नवीन आहेत. तर राष्ट्रवादी-शिवसेना शहर विकास आघाडीच्या ३ व एमआयएमच्या २ अशा अशा एकूण १६ सदस्यांची स्थायी समितीवर वर्णी लागली आहे. शिवाय महिला व बालकल्याण समितीच्या एकूण ११ सदस्यांसह ७ स्वीकृत नगरसेवकांची निवडही आज झालेल्या महासभेत करण्यात आली.
राजकीय पक्षांच्या गटनेत्यांच्या शिफारशीनुसार एकूण ७ जणांनी स्वीकृत सदस्य पदासाठी आपले अर्ज दाखल केले होते. आज झालेल्या सभेत गटनेत्यांनी सुचवलेल्या या सदस्यांची स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ओमप्रकाश गोपालकृष्ण खंडेलवाल, गुलशन उदासी, नरेश रुपला चौधरी, जयेश प्रविण वावदे, ऋषिकेश भिकन वराडे यांची निवड जाहीर झाली. तर एमआयएमचे अन्सारी मो. जावीद मो. शाबान व राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे तुषार (गणेश) प्रकाश जाधव यांना देखील स्वीकृत सदस्य पदी संधी मिळाली.
महानगरपालिका प्रशासनात स्थायी समितीला विशेष महत्त्व आहे. अनेक धोरणात्मक निर्णय याच समितीच्या माध्यमातून घेतले जात असल्याने या समितीत आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी वरिष्ठ स्तरावर फिल्डिंग लावली होती. मात्र भारतीय जनता पार्टीने हा अंदाज चुकवत या समितीमध्ये नवोदित चेहऱ्यांना संधी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीने योगिता संजय कुटे, कृपेश नांद्रे, विजय देवरे, शितल वाघ (पाटील), लताबाई सोनार, युवराज चौधरी, चेतन गवळी, निलेश नेमाणे या पहिल्या वेळेसच नगरसेवक झालेल्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
स्थायी समितीच्या सदस्य पदावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने योगिता संजय कुटे, कृपेश लक्ष्मण नांद्रे, विजय अरुण देवरे, शितल राहुल वाघ (पाटील), अमोल पावबा मासुळे, लताबाई यशवंत सोनार (पोतदार), युवराज (सनी) लक्ष्मण चौधरी, वंदना संजय भामरे, चेतन संजय गवळी, निलेश चंद्रकांत नेमाणे, विक्रम फकीरा थोरात, तसेच राष्ट्रवादी शिवसेना आघाडीच्यावतीने इरफान अहेमद फजलू रहेमान, शाहनाज बी गुलाम खाटीक, धिरज जवाहरलाल कलंत्री, अन्सारी हलिमा बानो मोहम्मद शाबान, आमीर असलम पठाण, यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी महिला आणि बालकल्याण समितीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शोभा संजय भिल, मिनल आकाश परदेशी (माळी), वैभवी अमित दुसाणे, प्रियंका खंडू बोरसे, उज्वला अनिल ठाकरे, प्रतिभा अनिल पाटील, संध्या सागर कदम, तसेच राष्ट्रवादी शिवसेना आघाडीचे परवीनबानो शेख रफिक, मंगला सुनिल सोनवणे, एमआयएम हसीनाबानो साजिद अली अन्सारी, अमोराबानो सऊदुल हसन यांची वर्णी लागली आहे.
स्वीकृत नगरसेवकपदी नियमाप्रमाणे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती व्हावी, असे सांगत अॅड. मयूर बैसाणे यांनी वैयक्तिक नामनिर्देशपत्र दाखल केले होते. शिवाय आणखी अन्य दोघांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. परंतु, या तिन्ही अर्जासोबत गटनेत्याचे शिफारसपत्र नसल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. दरम्यान, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना डावलत स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आल्याने याविरोधात आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा अॅड. मयूर बैसाणे यांनी दिला आहे.
महानगरपालिका निवडणुकीनंतर ही पहिलीच महासभा पार पडली. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असल्याने आज झालेल्या सभेत या नवीन नगरसेवकांच्या नातेवाईकांनी देखील सभागृहात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यामुळे सभेच्या कामकाजाला काहीसे गोंधळाचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे सभागृहात गर्दी झाली होती. ही गर्दी कमी करण्यासाठी महापौर मायादेवी परदेशी यांनी सदस्यांव्यतिरिक्त कोणीही थांबू नये, सदस्यांसोबत आलेल्या लोकांनी सभागृहाच्या बाहेर जावे, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठांसह इतरांनी कोणताही वाद न घालता सभागृहातून काढता पाय घेतला, त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरवात झाली.