

Sakri taluka crop damage
पिंपळनेर : गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात आलेला अवकाळी पावसाचा अंदाज अखेर खरा ठरला असून सोमवारी (दि.३०) दुपारी साक्री तालुक्यातील अनेक भागांना वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विशेषतः नांदवण शेतशिवारात तब्बल तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. नांदवण परिसरात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शेतात काढून ठेवलेला तसेच उभा असलेला कांदा पूर्णपणे भिजला. त्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि बाजारभावावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जाईल की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या ढगाळ वातावरण कायम असल्याने काढणीच्या कामांना वेग आला असला, तरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंतेत आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
रब्बी पिकांनाही फटका
रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांची काढणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी काढणी सुरू असून, तर काही ठिकाणी मळणीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत आलेल्या पावसामुळे ही पिके भिजल्याने दाण्यांचा दर्जा खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तासभर वादळी पावसाची हजेरी
नांदवण परिसरासह साक्री, पिंपळनेर, देशशिरवाडे, चिकसे, उंभरे, शेगाव, बल्हाणे, शेवगे आणि शेलबारी या भागांमध्ये सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात साठवून ठेवलेला माल वाचविण्यासाठी शेतकरी ताडपत्रीचा आधार घेत असून, पिकांचे संरक्षण करण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे.