Dhule news | जनगणनेच्या नोंदी अचूकपणे कराव्यात; जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश

16 मे ते 14 जून 2026 दरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन करण्यात येणार आहे
India Census 2027
India Census 2027
Published on
Updated on

धुळे : जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून तिच्या अचूकतेवरच विविध शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी अवलंबून असते. त्यामुळे जनगणनेचे काम करताना अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारी यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2027 अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ झाला. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक (शिरपूर), रोहन कुवर (धुळे), जनगणना संचालनालयाचे उपनिदेशक सागर बागुल, एसआय जीआर-2 श्रीकांत बनकर, तहसिलदार साहेबराव सोनवणे, अरुण शेवाळे, नितीनकुमार देवरे, महेंद्र माळी आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, प्रत्येक घर व व्यक्तीची माहिती अचूक नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शासनाला योजनांची प्रभावी आखणी करता येईल. यंदाची जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल व पेपरलेस पद्धतीने होणार असून ती दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. जनगणना कामकाजाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी येथे आयोजित 3 दिवशीय प्रशिक्षण आत्मसात करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उपनिदेशक सागर बागुल यांनी सांगितले की, जनगणना 2027 दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे दरम्यान प्रथमच स्व-गणना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये घरयादी व घरगणना केली जाईल. घरांची स्थिती, सुविधा व मालमत्ता यांची माहिती संकलित करून पुढील लोकसंख्या गणनेसाठी आधारभूत माहिती तयार केली जाईल. त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना करण्यात येणार असून ठराविक संदर्भ दिनांक व वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवली जाईल. यावेळी जनगणना प्रक्रियेत “सेन्सस 2027–एचएलओ” या मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्व-गणना केल्यास त्या माहितीची प्रगणकांकडून पडताळणी केली जाणार आहे.

या तीन दिवशीस प्रशिक्षणात जनगणना कार्यातील विविध बाबी, माहिती संकलनाची प्रक्रिया तसेच क्षेत्रीय पातळीवरील अंमलबजावणीबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या जनगणना कक्षाचे उद्घाटन उपनिदेशक सागर बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रशिक्षणाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news