

LCB Arrest Chalisgaon
धुळे : धुळे शहरासह राज्यभरात बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या करणाऱ्या दोन आंतरजिल्हा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चाळीसगाव येथून जेरबंद केले. या दोघांकडून सुमारे १३ तोळे सोन्याचे दागिने, ८३९ ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ८२ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अन्य भागांतही त्यांनी घरफोड्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
धुळे शहरातील पारोळा रोडलगत असलेल्या डोंगरे महाराज नगरात निलेश खंडेलवाल यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केली होती. घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी सुरू केला.
वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळाच्या परिसरासह धुळे शहरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून सुझुकी बर्गमन दुचाकीवरून फिरणाऱ्या दोन संशयितांवर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दीपक ढोके, पोलिस उपनिरीक्षक चेतन मुंढे तसेच पोलिस अंमलदार राहुल सानप, धर्मेंद्र मोहिते, आरिफ पठाण, शशिकांत देवरे, संतोष हिरे, अमोल पाटील आणि सुशील शेंडे यांच्या पथकाला संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. या पथकाने मुंबई, ठाणे, भिवंडी, कोल्हापूर, पुणे, मालेगाव आणि चाळीसगाव येथे शोधमोहीम राबवली.
तपासादरम्यान पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना संशयित मयुर ऊर्फ अमित सोपान भुंडे आणि त्याचा साथीदार ऋषभ जयस्वाल यांनी सुझुकी बर्गमन दुचाकीवरून धुळे शहरात येऊन दिवसा घरफोडी केल्याची माहिती मिळाली. दोघेही चाळीसगाव येथील नवनाथनगरमधील कृष्णकमल सोसायटीत राहत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिस पथकाने कृष्णकमल सोसायटीत सापळा रचला. त्यावेळी सोसायटीच्या गेटमधून सुझुकी बर्गमन (क्रमांक एमएच-४७/बीक्यू-२१३०) वरून दोन जण बाहेर पडताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांची नावे मयुर ऊर्फ अमित सोपान भुंडे (पाटील) (वय ३९, रा. टिळेवाडी, पुणे; सध्या रा. फ्लॅट क्रमांक ४, कृष्णकमल सोसायटी, चाळीसगाव) आणि ऋषभ भागवतप्रसाद जयस्वाल (रा. फ्लॅट क्रमांक ४०२, छबैया पार्क, कापुरवाडी, ठाणे) अशी असल्याचे समोर आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता दोघांनी धुळे येथील घरफोडीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या भाड्याच्या घरातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयुर ऊर्फ अमित सोपान भुंडे याच्याविरुद्ध पुणे शहरातील कोथरूड, वारजे माळवाडी, पर्वती, भोसरी, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, वाई, कोंढवा आणि डेक्कन तसेच सांगलीतील संजयनगर आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिस ठाण्यांत एकूण २७ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तर ऋषभ भागवतप्रसाद जयस्वाल याच्याविरुद्ध मुंबईतील नागपाडा आणि ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.