

धुळे : धुळे शहराजवळील मोहाडी उपनगरातील एका घरातून मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या सुमारे १६३ किलो अफूच्या (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा हा अमली पदार्थ, तसेच बनावट देशी दारूचा अवैध साठा असा एकूण २९ लाख ४१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने जप्त केला. विशेष म्हणजे या घरात अमली पदार्थांची भुकटी करणारे यंत्र आणि बनावट दारू तयार करून बॉटलिंग करणारे यंत्रदेखील आढळून आले आहे.
धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मोहाडी उपनगरातील कै. संजयभाऊ नगर येथे राहणाऱ्या गंभीर माणिक गावडे याने घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा अफूच्या बोंडांचा चुरा, पावडर तसेच बनावट देशी दारूचा साठा अवैध विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक वारे यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सपोनि दीपक ढोके, पोउनि अमित माळी, शाम निकम आणि पोलीस अंमलदार सतीश जाधव, शिरीष भदाणे, संदीप पाटील, सचिन गोमसाळे, हेमंत बोरसे, सुरेश भालेराव, नितीन दिवसे, दिलीप वाघ व महिला पोलीस अंमलदार राणी दामोदर यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंभीर गावडे याच्या घरावर छापा टाकून पाहणी केली. गावडे याच्या घरात सुमारे २७ लाख ८५ हजार ११० रुपये किमतीचा १६३ किलो ८३ ग्रॅम अफूच्या सुकलेल्या बोंडांचा चुरा (अमली पदार्थ), सुमारे ५ हजार ७६० रुपये किमतीचे दोन खोके (ज्यात 'टँगो पंच' देशी दारूच्या १८० मिलीच्या एकूण ९६ बाटल्या), सुमारे १ लाख रुपये किमतीचे बनावट दारू बनविण्याचे स्टीलचे इलेक्ट्रिक बॉटलिंग मशिन, तसेच सुमारे ५० हजार रुपये किमतीचे डोडा पावडर बनविण्याचे स्टीलचे इलेक्ट्रिक ग्राइंडर मशिन असा एकूण २९ लाख ४१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी आरोपी गंभीर माणिक गावडे याच्याविरुद्ध मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १२३ सह गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS) कलम १७(क), ८(क) व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.