

धुळे : डीजेच्या कर्णकर्कश आवाज आणि लेझरच्या लाईटमुळे मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी आता धुळ्यात इंडियन मेडिकल असोसिएशन मैदानात उतरली आहे. या अंतर्गत शुक्रवारी (दि.२९) मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात अनेक संस्था आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला डीजेवर बंदी घालण्याची विनंती केली.
यावेळी शासकीय आणि खाजगी सेवा देणाऱ्या असंख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन डीजेचे दुष्परिणाम नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मूक मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, आयएमए धुळेचे अध्यक्ष डॉ. मनिष जाखेटे, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र राजपूत, सचिव डॉ. योगेश ठाकरे, खजिनदार डॉ. राहुल बच्छाव, डॉ. चारूहास जगताप, डॉ. नारायण गलाणी, डॉ. संजय शिंदे, डॉ. रविंद्र पाटकरी, डॉ. विवेक जाधव, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. अभिनय दरवडे तसेच धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सेंट अँथनी स्कुलचे फादर विल्सन रॉड्रीक्स यांच्यासह शहरातील अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी स्मारकापासून हा मोर्चा आग्रारोड मार्गे महात्मा गांधी स्मारकापर्यंत काढण्यात आला. डीजेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे डीजेवर कायमची बंदी आणली पाहीजे, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
यावेळी आयएमए चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले की, डीजेच्या दणदणटामुळे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे समाजाच्या आरोग्यासाठी आयएमए व इतर संघटनांनी एक जागरुक नागरिक म्हणून हा प्रश्न हाती घेतला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, आमचा रोजगार बुडेल. परंतु, ज्या गोष्टींनी जनतेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतील. अशा व्यवसायाने रोजगार मिळणार असेल तर मग मटका व्यवसाय व देशी दारुलाही परवानगी द्यावी का? शेतकरी आत्महत्या करतात, त्यांनाही अफू आणि गांजाची लागवड करण्याची परवानगी द्यावी का? असा प्रश्न देखील डॉक्टर वानखेडकर यांनी उपस्थित केला. ज्या गोष्टींनी सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात, त्या गोष्टींचा आपण विरोधच केला पाहीजे. हायकोर्ट, सुप्रिम कोर्ट यांच्या आदेशाचे पालन डीजे चालकांनी केले पाहिजे, अशी आमची कळकळीची विनंती आहे. तसेच हा मोर्चा कोणत्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. डीजे कोणत्याही सणाला लावला तरी त्याचा आम्ही निषेध करतो. असेही त्यांनी सांगितले.
धुळ्याचे आय एम ए चे अध्यक्ष डॉ. मनीष जाखेटे म्हणाले की, समाजाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या डीजेला कायमस्वरुपी हद्दपार केले पाहीजे, अशी मागणी आहे. डीजेचा आवाज उत्साहाच्या भरात ८५ ते १२० डेसीबलवर पोहचतो, यामुळे श्रवणशक्ती कमी होणे, कानात सतत काहीतरी गुणगुणल्याची व सतत काहीतरी वाजल्याची जाणीव होणे, कर्णपटल व श्रवण पेशींना अपाय होणे, मस्तिष्क स्नायूंवर परिणाम होवून चिडचिड, झोप न लागणे, एकाग्रतेत अडथळा येणे, लहान मुलांच्या बौद्धीक विकासावर नकारात्मक परिणाम होणे, रक्तदाब वाढणे, हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे, गरोदर स्त्रियांमध्ये भ्रुणावर विपरित परिणाम होणे, वृध्दांमध्ये डोकेदुखीची समस्या उद्भवणे, असे शारिरीक विकार होतात. शिवाय वाहतूक कोंडी, मारामाऱ्या, अपघात असे सामाजिक दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डीजेविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले.
या मूक मोर्चात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नसल्या तरी मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलकांनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. मोर्चाच्या अग्रभागी 'शांत शहर, सुखी नागरिक यासाठी आम्ही सज्ज आहोत!' अशा आशयचा आयएमएचे बॅनर होते. तर मार्चेकऱ्यांचा हातात 'डीजेचे दुष्परिणाम आरोग्याचे नुकसान', 'लेझरच्या झगमगाटात आमचे डोळे विझत आहेत', 'आवाज नाही, संस्कार वाढवा', 'ध्वनी प्रदुषणाला नकार-निरोगी समाजासाठी प्रचार', 'आपला उत्सव आपली जबाबदारी', 'बाय बाय डीजे', 'थैंक्यू हायकोर्ट' अशा आशयाचे फलक लक्षवेधी ठरले.