

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील हक्काचे आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नसल्याचा निर्धार गुरुवारी राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाज बांधवांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्यासह मराठा बांधव अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून मुंबईतील बेमुदत उपोषणासाठी निघाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा जरांगे मुंबई येथे पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपासून त्यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा बांधव एकत्र आला आहे.
चार महिन्यांपूर्वी जरांगे यांनी या उपोषणाची घोषणा केली. त्यानुसार मुंबईकडे बुधवारपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव आझाद मैदानाकडे जाण्यासाठी निघाले. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळपासून उपोषणस्थळी मराठा समाज बांधव येत होते. या उपोषणासाठी भव्य असा मंडप याठिकाणी उभारण्यात आला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा आणि भगव्या टोप्या समाज बांधवांनी परिधान केल्या होत्या. हे उपोषण एक दिवसपेक्षा जास्त दिवस सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक मराठा बांधव जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईत आले आहेत. ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच प्रमुख मागणी असल्याचे समाज बांधवांनी सांगितले. आमची पिढी आरक्षणाशिवाय गेली आहे. आता मराठ्याच्या लेकरांना आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसायचे नाही, मराठा बांधवानी सांगितले.
जुन्नर : ‘एक मराठा - लाख मराठा’ अशा घोषणा देत शिवनेरी मार्गावर आंदोलकांनी मराठा आरक्षण घेणारच, असा एल्गार केला. जरांगे यांचे गुरुवारी पहाटे जुन्नरमध्ये आगमन आले. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ आंदोलकांनी शिवाजी महाराजांचा जयघोष करीत आरक्षणाची लढाई आता आरपार असल्याच्या घोषणा दिल्या.
ट्रक, टेम्पो, जीप आणि चारचाकींतून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते किल्ले शिवनेरी मार्गावर सहभागी झाले होते. किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंदोलक कार्यकर्ते शिवाई मंदिरात आल्यानंतर मनोज जरांगे यांच्या हस्ते देवीची आरती झाली. त्यानंतर ते शिवजन्मस्थळी नतमस्तक झाले. तेथील माती कपाळी लावून आरक्षणाची लढाई आता आरपार असेल, असे त्यांनी घोषित केले. यावेळी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवल्याखेरीज मागे हटणार नाही.