

Dhule crime news
धुळे: गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणाऱ्यास मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषध (कफ सिरप) विनापरवानगी कब्जात बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मालेगाव येथे राहणारा शकील दाऊद हा त्याच्या कब्जात मानवी मेंदुवर विपरित परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मोराणे येथे येत आहे. त्याच्यावर कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
या पथकाने मोराणे समोरील महामार्गावर सापळा रचून संशयीत सॅकसह उभा असलेल्या शकील सैय्यद दाऊद याला ताब्यात घेवून झडती घेतली असता, त्याच्याकडे मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारे गुंगीकारक औषधाच्या बाटल्या सापडल्या.
24,हजार 730 रुपयांच्या गुंगीकारक औषध (कफ सिरप) च्या 142 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 123, 278 व गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 21 (क) सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 चे कलम 18 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.