

धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळ्यात गोळीबार, खून आणि हल्ल्यांच्या घटना घडत असताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या जबाबदारीने देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याच्या सभेत एक शब्ददेखील काढला नाही. यातूनच धुळ्यातील गुंडगिरीला सत्तारूढ भाजपाचा पाठिंबा असल्याचे दिसून येत असल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांपूर्वीच्या भाषणाची घिसीपिटी रेकॉर्ड पुन्हा वाजवली. कार्यकर्त्यांसमोर हिंदुत्वाचा आव आणणाऱ्या भाजपाने अकोट पालिकेत एम.आय.एम. पक्षाशी युती करून हिंदुत्वाची वाट लावली, असा टोला देखील गोटे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात सभा झाली. या सभेवर आता माजी आमदार अनिल गोटे यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री नुकतेच धुळ्यात दर्शन घेऊन गेले. वस्तुतः त्यांच्याकडून जनतेची एकही अपेक्षा पूर्ण झाली नाही. गुंडांना असलेले राजकीय संरक्षण, शीख समाजाचे पवित्र स्थळ गुरुद्वारा रक्तलांछित झाले. धुळ्यात झालेल्या गोळीबाराचा उल्लेख, कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे भाषण होणे अपरिहार्य व आवश्यक होते. मुख्यमंत्र्यांनी गुंडगिरीच्या राजकारणाकडे हेतूतः दुर्लक्ष करून धुळे शहरात जणू काही रामराज्यच आहे, असे भाषणातून दाखवले.
धुळे शहरात माजलेली आणि वाढलेली गुंडगिरी याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढलेले नाही. याचा अर्थ सरळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहे की धुळे शहरात माजलेल्या गुंडगिरीस भाजपाचा अधिकृत पाठिंबा आहे. त्यांच्या आशीर्वादाने सर्व धंदे सुरू आहेत. त्यामुळे त्याविषयी बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही, याची सामान्य जनतेत चर्चा सुरू आहे.
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना व पाणीपुरवठ्याच्या इतर योजनांवर आतापर्यंत ३०९ कोटी रुपये खर्ची पडले. मात्र ८ ते १० दिवस पाणी येत नाही. म्हणून भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना आयुक्तांना घेराव घालावा लागला.
आजही अनेक कॉलनींमध्ये दहा दिवस पिण्याचे पाणी येत नाही. असे असताना शहराचे आमदार ‘एक दिवसाआड पाणी येते’ असे सांगून स्वतःच्याच नेत्याला फसवतात. भाषणाच्या ओघात आमदाराने आपले हायब्रीड हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी, ‘मंदिर पाडणारे पाहिजेत की बांधणारे पाहिजेत?’ असा प्रश्न केला. दिल्लीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोरील पंधराशे वर्षांपूर्वीचे हनुमानाचे आणि शंकराचे मंदिर पाडले. एवढेच नाही तर मूर्तींच्या गळ्यात साखळदंड अडकवून, जेसीबी आणि पोकलॅन्डने खेचून मूर्तीखाली पाडल्या. हे सगळे देशाने पाहिले आहे. नकली हिंदुत्ववादी कोण आहेत, याचा दुसरा परिचय देण्याची गरज नाही, असा टोला गोटे यांनी लगावला आहे.
धुळ्यात हायब्रीड हिंदुत्वाचा डंका वाजवणाऱ्यांच्या पक्षाने आपले नगराध्यक्षपद टिकावे यासाठी अकोट पालिकेत एम.आय.एम.च्या पाच सदस्यांचा उघडपणे पाठिंबा घेतला. तर अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली आहे. हे यांच्या हिंदुत्वाच्या कट्टरतेचे पुरावे आहेत. ज्यांच्या नेत्यांनी आपल्या घरात मुस्लिम जावई आणले, त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार तरी आहे काय? म्हणूनच मी यांना हायब्रीड हिंदुत्ववादी म्हणतो, असे मत गोटे यांनी मांडले आहे.
धुळ्याची जनता फार हुशार आहे. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच रोजंदारीने आणलेल्या महिला उठून जाऊ लागल्या. पगारी कार्यकर्ते मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐका, म्हणून गयावया करीत होते. त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती, असेही गोटे यांनी म्हटले आहे.