

आंबेवाडी नाका येथे मुंबई–गोवा महामार्गावरील मागण्यांसाठी तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू.
अंडरपास, सर्विस रोड व गटार झाकणांच्या मागणीसाठी नागरिकांचा ठाम निर्धार.
दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आंदोलनाला दिला उत्स्फूर्त प्रतिसाद.
कोलाड परिसरातील विविध संघटना व नागरिकांचा मोठा सहभाग.
कोलाड (विश्वास निकम) :
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी नाका (कोलाड–वरसगांव) येथे नागरिकांच्या सुरक्षेसह दैनंदिन वाहतुकीशी संबंधित महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले साखळी उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनाला आंबेवाडी, कोलाड व वरसगांव पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, गुरुवारी व्यापाऱ्यांनी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवत आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुंबई–गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड–वरसगांव येथील VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे २०० मीटर अंतरावर सुरक्षित अंडरपास (बोगदे) देण्यात यावेत, ही नागरिकांची प्रमुख मागणी आहे. पेण, नागोठणे, लोणेरे आणि महाड येथे ज्या प्रकारे अंडरपासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तशीच सुविधा आंबेवाडी नाक्यावरही द्यावी, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
याशिवाय, महामार्गालगतच्या सर्विस रोडचे काम अद्याप अपूर्ण असून त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्विस रोडचे काम तातडीने पूर्ण करून देण्यात यावे, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. महामार्गालगत उघड्या असलेल्या गटारांवर झाकणे न बसवल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटारांवर तात्काळ झाकणे बसवावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या साखळी उपोषणाला व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, टेम्पो संघटना यांच्यासह कोलाड परिसरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिल्याने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
या आंदोलनात माजी सरपंच सुरेशदादा महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, चंद्रकांत जाधव, संजय कुर्ले, महेंद्र वाचकवडे, विजय बोरकर, भाऊ गांधी, मिलिंद कदम, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल गांधी, ज्ञानेश्वर खामकर, विष्णू महाबळे, दगडू हाटकर, भावेश जैन, मयूर जैन यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या मागण्या केवळ विकासाच्या नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी या मागण्या मान्य कराव्यात, अशी एकमुखी मागणी सध्या आंबेवाडी नाक्यावरून होत आहे.