

Manager Looted in Dhule
धुळे : मुंबई - आग्रा महामार्गावर लळींग गावाजवळ फायनान्स कंपनीच्या वसुली व्यवस्थापकाला अडवून त्याच्याकडील रोकड लूट करणाऱ्या पाच जणांना मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने अटक केली आहे. या सर्व आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यातील उर्वरित चौघांना शोधण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आले आहे.
रोहित ऊर्फ बारकू आबा पवार ( रा. लळींग, ता.जि. धुळे), दिनेश चिंतामण माळी ( रा. लळींग ), भिमा टकाजी गवळी ( रा. लळींग ), लंकेश रविंद्र बोरसे ( रा. लळींग ) , गणेश जामसू सोनवणे, (रा. लळींग ) , युवराज विजय दावलसे, ( रा. डेडरगाव तलावाजवळ, तिखी.), चंद्रकांत श्रावण मोरे, (रा. डेडरगाव तलावाजवळ, तिखी) , शरद पूर्ण नाव माहित नाही. ( रा. डेडरगाव तलावाजवळ, तिखी) , समाधान ऊर्फ सोमा ( रा. डेडरगाव तलावाजवळ, तिखी) अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 25 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
धुळे शहरातील अरिहंत भवनाच्या पाठीमागे असणाऱ्या स्वस्ती फायनान्स प्रा.लि.कंपनीचे वसुली व्यवस्थापक आप्पासाहेब वाबुराव ठोंबरे हे कंपनीच्या वतीने अवधान, आर्वी, धाडरे, अनकवाडी, सोनेवाडी, लळींग गावातील बचत गटातील सभासदांचे दिवसभरात जमा केलेल्या हप्त्यांची एकूण रक्कम 1 लाख 84 हजार 300 रुपये हे बॅगमध्ये ठेवून मोटार सायकलवरून (एमएच 20 एफएन 5639) जात होते. यावेळी लळींग गावाजवळ मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हायवेच्या बोगद्याजवळ सर्विस रोडवर अज्ञात चोटरट्यांनी ठोंबरे यांच्या डोक्यावर अचानक काठीने मारहाण करून गाडीवरुन खाली पाडून गंभीर दुखापत केली. व त्यांच्या ताब्यात असलेली पैशांची बॅग बळजबरीने हिसकावून घेवून पळून गेले होते. त्यावरुन मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, हवालदार पंकज चव्हाण, मनिष सोनगिरे, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, रमेश शिंदे, चेतन झोळेकर, असद सय्यद यांनी केली.