

Jarange Patil will hold a Chakka Jam movement in support of Bachchu Kadu
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा :
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती येथे बेमुदत उपोषणास बसलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध शेतकरी संघटनांकडून रविवारी (दि.१५) चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे.
शहागड येथील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहागड येथील पैठण फाट्यावर रविवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे या आंदोलनात सहभागी होणार आहे.
याबाबत जरांगे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरणार आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने १५ जून रोजीच्या चक्का जाम आंदोलनात सहभागी व्हावे. बच्चू कडू हे मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन करत आहेत.
त्यांच्या मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांसाठी सुविधा व योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदींचा समावेश आहे. राज्यभरातून शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन या आंदोलनात सामील व्हावे, ही वेळ एकसंघपणे लढण्याची आहे, असेही जरांगे यांनी आवाहन केले.