

धुळे : शिरपूर तालुक्यातील जुनापाणी शिवारात कापसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केलेल्या कारवाईत साडेसात लाखाची गांजाची रोपे जप्त करण्यात आली असून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या जुनापाणी शिवारामध्ये वन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना देवून छापा कारवाई कामी परवानगी घेतल्यानंतर पथक गठीत केले. या पथकाने छापा टाकला असता जुनापाणी या परीसरात वनविभागाच्या जमिनीवर अतीदुर्गम भागात राजाराम नकाराम पावरा, विकास नकाराम पावरा यांनी कपाशीच्या पिकामध्ये आंतरपिक म्हणून प्रतिबंधीत कॅनाबीस या गांजा पिकाची बेकायदेशीरपणे लागवड केल्याची बाब निदर्शनास आली.
घटनास्थाळावरुन एक आरोपी नामे विकास नकाराम पावरा यास ताब्यात घेण्यात आले असुन एक आरोपी पोलीस आल्याचे पाहुन पळुन गेला. या कारवाईत सुमारे 7 लाख 50 हजार रूपये किंमतीचा एकुण 150 किलो वजनाचा कॅनाबीसची ( गांजा)रोपे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोकॉ सुनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एन डी पी एस अॅक्ट चे कायदा कलम 8 (क), 20 (अ) (i), व 28 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत. कारवाई पथकामध्ये पोसई मनोज कचरे, पोलीस अंमलदार संतोष पाटील, संदिप ठाकरे, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे, संजय भोई, सुनिल पवार, दिनकर पवार, धनराज गोपाळ, मनोज नेरकर अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी यांचा सहभाग होता.