

धुळे : शिरपूर तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या टिटवापाणी परिसरात वन जमिनीवर गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने उध्वस्त केली आहे. या कारवाईत दोन शेतांमधून सुमारे 24 लाखाचे गांजाचे पीक जप्त करण्यात आले असून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील टिटवापाणी या भागामध्ये वन जमिनीवर गांजाची शेती केली जात असल्याची माहिती निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी या माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मनोज कचरे, पोउनि मिलींद पवार आणि पोलीस अंमलदार संजय चव्हाण, सागर ठाकुर, संतोष पाटील, संदिप ठाकरे, कैलास कोळी, दिनेश सोनवणे, योगेश मोरे, विजय ढिवरे, सुनिल पवार, वाला पुरोहित, धनराज गोपाळ, अल्ताफ मिर्झा व इसरार फारुकी या पथकाच्या मदतीने छापा टाकला.
यावेळी टिटवापाणी या परिसरात वनविभागाचे जमिनीवर मदन भरतसिंग पावरा, (रा.टिटवापाणी पो. चिलारे ता. शिरपूर), अमित थावऱ्या पावरा( रा. चितोर ता. शिरपूर) यांनी कपाशी पिकामध्ये मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थ अवैधरित्या कॅनाबीस वनस्पतीची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलीसांची चाहुल लागल्याने दोन्ही आरोपी शेतातून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान पथकाने आरोपी मदन भरतसिंग पावरा हा कशात असलेल्या वन जमिनीमधून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 300 किलो गांजाचे पीक, तर अमित थावऱ्या पावरा कसत असलेल्या वनजमिनीवरुन सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे 180 किलो गांजाचे पीक जप्त करण्यात आले आहे. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8 (सी), 20 (अ) (आय), 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.