

धुळे : जिल्ह्यात बाबळे औद्योगिक वसाहतीमधील बनावट दारूचा कारखाना उध्वस्त करण्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारात बनावट दारू तयार करण्याचा दुसरा कारखाना धुळे तालुका पोलिसांनी उध्वस्त केला आहे. घटनास्थळावरून सुमारे चार लाख अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात नामांकित कंपन्यांची स्टीकर लावलेल्या दारूच्या सीलबंद बाटल्या तसेच स्टीकर आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन जप्त करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट दारू तयार केली जात असल्याचे प्रकार घडले आहेत. या संदर्भात वेळोवेळी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीही बनावट दारू तयार करणारे तस्कर पोलीस कारवाईला जुमानत नसल्याचे दिसून येते आहे. विशेषता बाभळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या आठवड्यातच छापा टाकून बनावट दारू तयार करण्याचे केंद्र उध्वस्त करण्यात आले होते. पण आता पुन्हा धुळे तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुंडाणे शिवारात असेच केंद्र सुरू असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारातील शेत गट क्रमांक-199/1/अ/1/ब मधील शेतातील बंदीस्त घरात बनावट देशी विदेशी दारु तयार करण्याचा कारखाना उभारुन त्या मालाची निर्यात सुरू आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे ही माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे,उप-विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांना देऊन छाप्याचे नियोजन करण्यात आले.
या ठिकाणी छापा टाकला असता देशी विदेशी दारुचा साठा व तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे साहित्ये मिळून आली. यात सुमारे 1 लाख 6 हजार 200 रुपये किमतीचे एकुण 1180 नगर रॉयल चॅलेन्ज फायनेस्ट प्रिमिअम व्हिस्की कंपनीची 180 मिली मापाची लाल रंगाची प्लास्टीकची बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांवर मॅन्युफॅक्चर बाय खेमानी डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड, रंगनवाडा रोड, दमण असे बनावट स्टिकर छापले असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सुमारे 10 हजार 800 रुपये किमतीचे देशी दारु प्रिन्स संत्रा ,प्रत्येक बाटलीवर मेहेर डिस्ट्रीलरीज प्रायव्हेट लिमीटेड, अस्वा (ता.डहाणू जि. पालघर) असे प्रिन्ट असलेले लेबल असलेल्या 135 बाटल्या, सुमारे 1 लाख 3 हजार 200 रुपये किमतीचे देशी दारु सुगंधी संत्रा कंपनी , वी के डिस्ट्रीलरीज प्रायव्हेट लिमीटेड, खंडाळा (ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) असे प्रिन्ट असलेल्या 1290 बाटल्या अशी बनावट दारू आढळून आली.
घटनास्थळावरून बाटलीला सीलबंद बुच लावण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे 50 हजार रुपये किमतीचे मशीन, तसेच पॅकिंगचेच काम करण्यासाठी वापरात येणारे सुमारे 30 हजार रुपये किमतीचे अन्य मशीन, सुमारे 6465 रुपये किमतीच्या 1293 नग प्लास्टिकच्या 180 मिली क्षमतेच्या बाटल्या, सुमारे 6000 रुपये किमतीच्या 180 मिली क्षमतेच्या एक हजार दोनशे नग काचेच्या बाटल्या, वी के डिस्ट्रीलरीज प्रा.लि. अहमदनगर असे प्रिन्ट असलेले पत्र्याचे बुच बाटलीवर लावण्यासाठीचे 1हजार नग बुच, सुमारे 52 हजार रुपये किमतीच्या दोन प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये दारू तयार करण्यासाठी वापरात येणारे रसायन, 50 हजार रुपये किमतीचे वॉटर प्युरिफायर यांच्यासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले पथकाने घटनास्थळावरून 4 लाख 18 हजार 165 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोकॉ विशाल भालचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरुन धुळे शहरातील मोगलाई चर्च परिसरात राहणारा इरफान रऊफ पटेल याच्या विरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम-123, 318[4], 348, 349, 350 सह महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम-1949 चे कलम-65 [अ]. [ब], [क], [ड], [ई], [फ] प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता तपासासाठी सात ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .