

Navalnagar Pistol Arrest
धुळे : आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन गुन्हेगारी टोळीतील चार सदस्यांसह एकूण १२ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपारीचा आदेश लागू असताना संबंधितांनी जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५५ आणि ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
कलम ५५ अंतर्गत सुलतान खालीद पिंजारी, मोना खालीद पिंजारी, चॅम्पियनसिंग मिलनसिंग भादा आणि फतेसिंग मिलनसिंग भादा या चौघांना हद्दपार करण्यात आले आहे.
तर कलम ५६ अंतर्गत कृष्णा जामसिंग पारधी, अनिल जामसिंग पारधी, हाशीम मलक अब्दुल रहेमान, खुशाल ऊर्फ दादू परमेश्वर गोसावी, भाईदास आकाश मोरे, विजय श्रावण नेतले, स्वप्निल बबन घोलप आणि शुभम शरद माळी या आठ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपारीच्या कालावधीत संबंधितांना धुळे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश, वास्तव्य किंवा वावर करण्यास मनाई आहे. हद्दपार व्यक्ती जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
धुळे : दहशत माजविण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवलनगरजवळ अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मॅगझिनसह एकूण सुमारे ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नवलनगर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली. पारोळा तालुक्यातील पिंपळखुटा येथील जगदीश पुंडलिक पाटील आणि अजय पितांबर भिल हे दोघे मोटारसायकलवरून परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मॅगझिन आढळून आले. त्यानंतर दोघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात जगदीश पाटील याच्याविरुद्ध यापूर्वी तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने दोन्ही संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, हे शस्त्र त्यांनी कोठून मिळविले, त्यांना शस्त्र पुरवठा करणारा मूळ स्रोत कोण आहे, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.