Dhule Crime News | मुंबई आग्रा महामार्गावर तोतया जीएसटी अधिकारी पुन्हा कार्यरत, पुण्याच्या कंपनीला एक लाखांचा घातला गंडा

file photo
file photo
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे येथील बनावट जीएसटी अधिकार्‍यांनी केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाचा धुराळा खाली बसत नाही, तोच पुन्हा मुंबई आग्रा महामार्गावर तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कंपनीला एक लाखात गंडवल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता जीएसटीच्या नावाखाली लूट करून सरकारी तिजोरीवर डाका टाकणाऱ्या मुख्य म्होरक्याला गजाआड करण्याची मागणी पुन्हा पुढे आली आहे.

शिरपूरजवळ चार भामट्यांनी जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून कंपनीचा ट्रक आणि कागदपत्रे ताब्यात घेऊन त्याबदल्यात फोन पे वर एक लाख रुपयांची खंडणी उकळली असल्याचे उघड झाले आहे. याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कंपनीतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार, दिल्ली येथे चार ते सहा ऑक्टोबरदरम्यान पॅकेजिंग मटेरिअलचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात पुणे येथील इन्फिनिटी सोल्यूशन्स कंपनीने सहभाग घेतला होता. प्रदर्शनासाठी कंपनीने आपल्या वाहनातून यंत्रसामुग्री नेली होती. प्रदर्शन संपल्यानंतर वाहनचालक सतीश डांगी ट्रक (एमएच 46, बीव्ही 0462) घेऊन पुणे येथे जाण्यासाठी निघाले. 10 ऑक्टोबरला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महेश नवले यांनी अकाऊंट मॅनेजर रोहित कुलकर्णी यांना कंपनीचा ट्रक धुळे येथे जीएसटी अधिकार्‍यांनी पकडला आहे, त्यांच्याशी बोलणे करा असे सांगितले. कुलकर्णी व नवले यांनी संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून वाहन चालकाकडे असलेले डिलिव्हरी चलन चुकीचे असून यंत्रे जप्त करण्याची धमकी दिली. वाहन परत हवे असेल तर तातडीने 200 टक्के दंड भरावा लागेल असेही त्याने सांगितले. कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्याला ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करतो असे सांगून वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र त्याने वेळ नसल्याचे सांगून अडीच लाख रुपये देवून टाका असा निरोप दिला. तडजोडीअंती त्याने एक लाख पाच हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली.
दरम्यान कंपनीच्या अधिकार्‍यांनी, चालकाशी संपर्क केला असता त्याने शिरपूरजवळ हाडाखेड येथे सीमा तपासणी नाक्याजवळ राजस्थानी ढाब्यावर बॉलेरो वाहन उभे असून त्यातील चार जणांनी कागदपत्रे आणि ट्रक ताब्यात घेतला आहे अशी माहिती दिली. बॉलेरो वाहनावर पोलिस लिहिले असल्याचेही त्याने सांगितले. कंपनीच्या अधिकार्‍यांनी फोन पे वरून ठरलेली रक्कम दिली. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यात बनावट जीएसटी अधिकार्‍यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी वृत्तपत्रात आढळल्यानंतर फसगत झाल्याचा कंपनीला संशय आला. त्यानंतर सांगवी पोलिसांना माहिती देऊन फिर्याद देण्यात आली. त्यानुसार आता तोता या अधिकाऱ्यांविरोधात भादवि कलम 419, 420 ,441,170, 171, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्य म्होरक्या मोकाटच

धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर अशाच प्रकारे गाड्या अडवून त्यांच्याकडून जीएसटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा केली जात होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात पोलीस कर्मचारीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने त्याला सरकारी गाडी देण्यात आली होती. या गाडीचा वापर महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक अडवून त्यांच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्याचा बनाव करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसा वसुली केला जात होता .या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी केला. त्यात या टोळक्याने तब्बल चार कोटी रुपयांची वसुली केल्याचे निष्पन्न झाले. विशेषता या प्रकरणात वीस पेक्षा जास्त बँकेची खाती सील करण्यात आली होती. यानंतर हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाला. त्यामुळे जीएसटीचा घपला थांबला असावा असे वाटत असतानाच आता पुन्हा शिरपूर नजीक चौघा भामट्यांनी गाडीवर पोलीस हे नाव वापरून पुन्हा लूट सुरू केल्याचा गुन्हा दाखल झाला. यावरून या प्रकरणाच्या गुन्ह्याचा म्होरक्या गजाआड करणे आवश्यक असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news