

Dhule Woman Assault Case
धुळे : धुळे शहरातील आझादनगर परिसरात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडील मोबाईल आणि अत्याचारावेळी वापरलेले कपडे जप्त करणे, तसेच पीडितेचा तयार करण्यात आलेला कथित व्हिडिओ अन्य कुणाला पाठविण्यात आला आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. पराग पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिने एका अनोळखी व्यक्तीला घरी सोडण्याची विनंती केली होती. संबंधित व्यक्तीने तिला घरी सोडल्यानंतर या घटनेची माहिती असलेल्या तिघांनी तिच्या घरी जाऊन कथित अत्याचार केला. यावेळी साहिल हबीब पिंजारी याने पीडितेचा व्हिडिओ तयार करून दोन हजार रुपयांची मागणी केली. तिच्याकडील ७०० रुपयेही घेतल्याचा आरोप आहे. बाबु इरफान शाह आणि समद शेख जब्बार यांनीही त्याला साथ दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी बीएनएसच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही तत्काळ अटक करण्यात आली.
दरम्यान, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात ठिय्या देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तपासाला गती दिली.
घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी केले आहे. पीडितेला पोलीस बंदोबस्तही देण्यात आला आहे. विविध राजकीय पक्षांनी आरोपींवर कठोर कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली आहे.