

धुळे: शहर विधानसभा मतदारसंघात 2019 ते 2024 या पाच वर्षाच्या कालावधीत 14 हजार मतदारांचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्ह्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दहा वर्षात केवळ 3171 मयत मतदारांची नावे वगळल्याची माहिती दिली आहे. यावरून 11हजार मतदारांनी वेगवेगळ्या निवडणुकीत मतदान केल्याचे स्पष्ट होत आहे. बोगस मतदान संदर्भात आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडेच याचिका करणार असल्याची माहिती आज माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.
धुळे येथील कल्याण भवनात झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, सलीम शेख तसेच तेजस गोटे यांची उपस्थिती होती. यावेळी बोगस मतदानासंदर्भात माहिती देताना गोटे यांनी सांगितले की, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मयत मतदारांची माहिती मिळाली आहे. यावरून 11000 मयत मतदारांच्या नावावर मतदान करण्यात आले असल्याचे दिसते आहे.
धुळे शहरामध्ये 1319 घर नंबरमध्ये 195 परिवार राहतात. तर भंगार बाजार, पेठ 13 या भागात देखील बोगस मतदार असल्याचे मतदार यादीत दिसते आहे. धुळे शहर मतदार संघात 288 बूथ असून या बुथवर कोणत्या मतदारांनी कोठे मतदान करायचे याची माहिती उपलब्ध आहे. मात्र घर नंबर १३१९ भंगार बाजार, पेठ 13 याचा उल्लेख या यादीमध्ये दिसत नाही. यावरून या बोगस मतदार असल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. पेठ 13 तसेच घर नंबर १३१९ याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याकडून मागितली. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही.
केवळ न्यायालयात याचिका दाखल असल्याचे कारण सांगून माहिती देणे टाळले जाते. त्यामुळे आता आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका करणार असून भ्रष्ट निवडणूक यंत्रणेची चौकशी करावी, तसेच देशाच्या मुख्य व्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या या यंत्रणेतील भ्रष्ट झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत ,असे देखील गोटे यांनी सांगितले.