

कराड : विधानसभा निवडणुकी दरम्यान कापिल ता. कराड येथे झालेल्या मतदार नोंदणीतील बोगस प्रकाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परगावच्या 9 लोकांनी बोगस मतदान केले आहे. या सर्व प्रकरणाला कराडचे मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे व संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील जबाबदार असल्याचा आरोप गणेश पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान बोगस मतदारांना वाचविण्यासाठी प्रशासन मदत करत आहे. त्यामुळे प्रांत व अव्वल कारकून यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच त्या 9 बोगस मतदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बुधवार दि. 8 ऑक्टोबर पासून कराड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश पवार यांनी दिला आहे.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गणेश पवार यांनी कागदोपत्री पुराव्यासह पत्रकारांना माहिती दिली. यावेळी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे उपस्थित होते.
गणेश पवार माहिती देताना म्हणाले, कापिलचे मतदार नसलेल्या 9 लोकांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची तक्रार केली होती. मात्र कराडच्या निवडणूक विभागाने संबंधितांवर कारवाई केली नसल्याने दोन महिन्यापूर्वी 9 दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते.
यावर प्रांतांनी सदरच्या 9 लोकांची शहानिशा करून त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ती नावेच चुकीच्या पध्दतीने मतदार यादीत नोंदवली गेली आहेत. प्रशासनाने त्यांना मतदानही करू दिले. त्यामुळे प्रशासन बोगस मतदारांना पाठिशी घालत आहे. ते 9 लोक कापिलचे रहिवाशी असल्याचे दाखवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने भाडेकरार व नोटरी करण्यात आल्या आहेत. यात अनेक त्रुटी आहेत. विषेश म्हणजे चुकीच्या पद्धतीने केलेले भाडे करार व नोटरी निवडणूक विभागाने स्वीकारले आहेत.यापूर्वी आपण त्या बोगस मतदारांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र आता त्यात मतदान नोंदणी अधिकारी व संजय गांधी शाखेचे अव्वल कारकून दोषी असल्याचे दिसून येत आहे.
चुकीच्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी व भाडेकरार केल्याने यात आणखी काहीजणांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकार्यांवरकारवाई करावी,अशी मागणी पवार यांनी केली आहे.