

मुंबई : विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासाठी सर्व मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडा. याशिवाय मतदान केंद्रे वाढवून प्रत्येक बुथवरील मतदारसंख्या आटोपशीर ठेवावी, अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे मंगळवारी केली.
लोकसभा निवडणुकीतील मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी भरपूर वेळ लागला होता. त्यामुळे लांबच लांब रांगा वाढून मतदारांना तासन्तास ताटकळत राहावे लागले होते. तसेच मतदार केंद्रांवरील गैरसुविधेमुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. याचा मतदानावर परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
बनावट मतदानाला प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण दुबार नावांची संगणकीय नोंद करून एका बुथवर दुबार यादीतील मतदाराने मतदान करताच ते दुबार नाव असलेल्या केंद्रावर तत्काळ संदेश पाठवून त्याचे दुसर्यांदा होऊ शकणारे मतदान रोखता येईल आणि मतदाराच्या छायाचित्रामुळे हे शक्य आहे, असे देसाई यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट युनिट व कंट्रोल युनिटमध्ये असलेल्या बॅटरीमधील इंडिकेटरमध्ये मतदान सुरू होण्याची तारीख व वेळ, बॅटरीचा कोड नंबर आणि मतदान सुरू करताना व बंद होताना किती बॅटरी चार्ज आहे याची नोंद फॉर्म-17 मध्ये नमूद करावी, अशीही मागणी करण्यात आली.