धुळे – पुढारी वृत्तसेवा – शहरात विविध ठिकाणी ठेकेदारांनी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्याचप्रमाणे मलनिस्सारण योजनेअंतर्गत देखील निकृष्ट दर्जाचे काम होऊन देखील संबंधित ठेकेदारांवर अद्याप शासकीय स्तरावरून कोणतीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वीच झालेल्या श्री एकविरा देवी मंदिराजवळील रस्त्याला भले मोठ्ठे भगदाड पडल्यामुळे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोमवार (दि.१०) रोजी संतप्त आंदोलन छेडण्यात आले.
देवपुरातील श्री एकविरा देवी मंदिराजवळील रस्त्याला मोठ्ठे भगदाड पडल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये उडी मारून रोष व्यक्त केला. प्रशासनाने ठेकेदारांचे हित जोपासले असल्याचा खळबळजनक आरोप देखील यावेळी करण्यात आला. केंद्र शासनाच्या भुयारी गटार योजनेचे पाईप नदी पात्रात सोडण्यासाठी पाईप टाकण्यात येऊन नव्याने हा रस्ता नुकताच बनवण्यात आला होता.
पांझरा नदी किनारी नुकताच झालेल्या डांबरीकरणाला ठिकठिकाणी किमान दोन चार फुटाचे खड्डे पडले असून एकविरा देवी मंदिरासमोरील रस्त्यांना पहिल्याच पावसात मोठ्ठे भगदाड पडले आहे. अतिशय तकलादु स्वरूपातील रस्त्यांना रंगरंगोटी करून निधी उपटण्याचे काम ठेकेदार व प्रशासनाच्या संगनमताने झालेले असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
मजीप्राने बांधकाम विभागाला दिलेल्या या कामाप्रती अधिकाऱ्यांचे पहिल्यापासून दुर्लक्ष होते. यापूर्वीही अनेक पक्षांनी या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. परंतु शासकीय स्तरावरून कोणतीही कारवाई झालेली नाही. उलटपक्षी ठेकेदाराला बिल काढण्यासाठी प्रशासनाने मदतच केली. कामात कुचराई करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर ताबडतोब गुन्हा दाखल होऊन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने अनोखे आंदोलन करत खड्ड्यात उडी मारून प्रशासनाचे लक्ष वेधले. पाच वर्षापासून मंद गतीने सुरू असलेल्या 156 कोटीच्या मलनिस्सारण योजनेचे काम गुजरातच्या पटेल नामक ठेकेदाराला दिलेले आहे. या ठेकेदाराने कामात कसूर केल्याच्या अनेक तक्रारी होऊन देखील आजपर्यंत ठेकेदारावर कोणतीच कारवाई झालेली नाही. आजही एस एस व्ही पी एस कॉलेज समोरील खड्डा मागील आठ महिन्यापासून काम सुरू असून देवपुरातील नागरिकांना रहदारी खूपच अडचण होत आहे. यापूर्वीही अनेक निकृष्ट कामातून धुळेकरांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम सत्ताधारी व प्रशासनाने केले होते. अशी टीका देखील शिवसेनेने यावेळी केली आहे.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, ललित माळी, भरत मोरे, प्रवीण साळवे, कैलास मराठे, कपिल लिंगायत, संदीप चौधरी, शत्रुघ्न तावडे, महादु गवळी, आनंद जावडेकर, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, भटु गवळी, नितीन जडे, छोटू माळी, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.
हेही वाचा: