दुर्दैवी: विक्रोळी येथे इमारतीचा भाग कोसळून पितापुत्राचा मृत्यू

विक्रोळी येथे इमारतीचा भाग कोसळून पितापुत्राचा मृत्यू झाला.
विक्रोळी येथे इमारतीचा भाग कोसळून पितापुत्राचा मृत्यू झाला.

घाटकोपर, पुढारी वृत्तसेवा: मुंबई उपनगरातील विक्रोळी मधील इमारतीचा स्लॅब कोसळून २ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. ९) रात्री विक्रोळी पार्कसाइट कैलास कॉम्प्लेक्स येथे निर्माणाधीन इमारतीचा काही भाग कोसळून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जेवणाचा डब्बा अन् मुलावर काळाचा घाला  

विक्रोळी पार्कसाईट येथील नागा बाबा नगर येथे बिल्डकॉम या विकासकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणीच तळ मजल्यावर या विकासकाचे कार्यालय आहे. येथे नागेश रेड्डी (वय ३८) हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. रविवारी ते नेहमीप्रमाणे कामावर आले. यावेळी मुंबईत जोरदार पाऊस कोसळत होता. त्यांचे घर जवळच असल्याने त्यांचा १२ वर्षाचा मुलगा रोहित रेड्डी हा त्यांच्या जेवणाचा डब्बा घेऊन पावसातून तिथे आला होता.

पाऊस खूप कोसळत असल्याने त्यांनी त्यांच्या मुलाला तिथेच थांबण्यास सांगितले. ते दोघे ही तळमजल्यावर विकासकाच्या ऑफिस समोर आडोश्याला थांबले होते. या वेळी अचानक इमारतीचा काही भाग आणि फोर्सिलिंगचा लोखंडे ढाचा थेट त्यांच्यावर कोसळला. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

नातेवाईकांची कारवाईची मागणी

स्थानिक नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या इमारतीच्या सुरक्षेबाबत मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. मागील काही दिवसांत विक्रोळी भागात अशा दोन दुर्देवी घटना घडल्याने आणि पावसाळा सुरु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news