

धुळे : राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले पाशवी बहुमत पाहता त्यांच्या सोबत असणाऱ्या शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोनही मित्र पक्षांसाठी ही धोक्याची घंटा वजा इशारा आहे.
पुढील काळात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र किंवा आघाडीतील पक्ष असणार नाही. प्रत्येक मित्र पक्षाचा घात करणे, हा भारतीय जनता पार्टीचा मूळ स्वभाव आहे. त्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा मित्र पक्ष असणारा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना संपवण्यासाठी निघाले आहे . याचा अंदाज सर्वांना आला आहे .या अर्थानेच देवेंद्र फडणवीस हे जल्लादाच्या भूमिकेत असल्याची विषारी टीका आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धुळ्यात केली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आज धुळ्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात खासदार शोभाताई बच्छाव ,भा.ई. नगराळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष साबीर शेख, जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे ,निरीक्षक जावेद फारुकी ,प्रभारी राजाराम पाटील पानगव्हाणे, भरत टाकेकर, पितांबर महाले, रमेश श्रीखंडे, माजी उपमहापौर शवाल अन्सारी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सपकाळ यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. भारतीय जनता पार्टी देशात फोडा आणि झोडा तसेच खून खराब करण्याची राजकारण करत आहे. मात्र या देशाला बलिदान आणि हौतात्म देऊन स्वातंत्र्य मिळाले.
त्या नंतर देखील लाखो लोकांनी बलिदान दिले. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस आंदोलन आणि बलिदान देत होती. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांबरोबर बसून त्यांचे समर्थन करीत होते. तर देशातील काही भागांमध्ये बॅरिस्टर जिना बरोबर सत्ता उपभोगत होते, अशी टीका त्यांनी केली. हा देश हिंदू आणि मुस्लिम दोघांचा आहे. त्याबरोबर शीख आणि ख्रिश्चन यांचा देखील आहे. या देशात राहणाऱ्या प्रत्येकाचा हा देश आहे. भारतीय जनता पार्टीची अ, ब आणि क अशा अनेक टीम आहेत. तर त्यांच्या खिशात आणखी अन्य पक्ष देखील आहेत, असा टोला देखील त्यांनी लावला. धुळ्यातील रस्त्यांची धूळधाण पाहता हा भाजपाचा भ्रष्टाचार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जल्लाद म्हटले. पण आपण त्याचा आज पुन्हा पुनरुच्चार करतो आहोत. भारतीय जनता पार्टी ही मित्र पक्षाला संपवण्याचे काम करते. महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीस तेच काम करीत आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील बहुमत पाहता ते मित्र पक्षांना संपवण्याच्या भूमिकेत आहेत. यातूनच ते जल्लाद असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. लोकतंत्र, सभ्यता आणि संस्कृतीला फासावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे .त्यांची स्मरणशक्ती देखील कमी झाली आहे. यापूर्वी त्यांनी विदर्भ वेगळा झाला नाही, तर लग्न करणार नाही, अशी घोषणा केली. मात्र विदर्भ अद्यापही वेगळा झाला नाही. राष्ट्रवादी बरोबर कधीच युती नाही ,तसेच अजित पवारांना माफी नाही ,अशी देखील घोषणा त्यांनी केली. मात्र आज राष्ट्रवादी आणि अजित पवार दोघेही त्यांच्याबरोबर सत्तेची फळे चाखत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहीपेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फेकण्याची काम करतात, अशी टीका देखील सपकाळ यांनी केली.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांचे सदस्यत्व रद्द केले. 48 तासाच्या आत घर खाली करण्याची नोटीस दिली. तसेच सुनील केदार यांना देखील 24 तासाच्या आत आमदारकी रद्द केली. मात्र रमीचे फार मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू असणारे राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर ताबडतोब ताब्यात घेतले गेले नाही. हेच प्रशासन त्यांची सुरक्षा करताना दिसले. त्यांना पळवून लावणे, लपवणे अशी भूमिका पार पडली. त्यांची सोय होईल, असे वातावरण तयार केले गेले. त्यांना बेल मिळवण्याकरता सरकार गप्प होते .तर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर त्यांना सुप्रीम पर्यंत जाण्याची मदत केली गेली. बीजेपी हा न खाऊंगा न खाने दूंगा या धर्तीवर काम करत नाही तर मील बाटके खाओ ही त्यांची भूमिका आहे, असा टोला त्यांनी लावला.
काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा भाजपने केली. मात्र आज तेच काँग्रेस युक्त झाले आहे. अशी टीका देखील त्यांनी केली. या जाहीर कार्यक्रमात बोलताना खासदार शोभाताई बच्छाव यांनी देखील 50 प्लस चा नारा दिला आहे.