राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील लाचखोर सहाय्यक समादेशकास अटक

file photo
file photo

धुळे पुढारी वृत्तसेवा- राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील नर्सिंग ऑफिसर कडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षकास धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद दल येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहेत. दलातील तक्रारदार व त्यांचे सोबत इतर ५ महिला नर्सिंग ऑफिसर १४ व १५ एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांचे कडुन गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर चंद्रकांत पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावुन घेवुन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी १,०००/- रुपये असे एकुण ५००० रुपये जमा करुन मला आणुन दे, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल ,असे तक्रारदार यांना सांगितले होते. तक्रारदार यांना कर्मचा-यांकडुन पैसे जमा करुन सदरची लाचेची रक्कम ५००० रुपये अशी आलोसे पारसकर यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आलोसे चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी तक्रारदार यांचेकडे प्रती गैरहजर कर्मचा-यांकडुन १,००० रुपये याप्रमाणे ५००० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम पारस्कर यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले. त्यानुसार धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने सापळा लावला.

लाचेची रक्कम आज पारसकर यांच्या एस.आर.पी. कॉलनी, नकाणे रोड येथील राहते घरी स्विकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकुन दिली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांचे विरुध्द पश्चिम देवपुर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news