

धुळे, पुढारी वृत्तसेवा : कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांचे पैसे घेऊन जाणाऱ्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून ७ लाखांची लूट करणाऱ्या टोळक्याला गजाआड करण्यात यश आले आहे. या टोळक्यांकडून २ लाख ६१ हजाराची रोकड जप्त करण्यात यश आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. Dhule News
धुळे तालुक्यातील आर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस व्यापाऱ्याला विकला होता. या कापसाची ७ लाखांची रोकड घेऊन आव्री येथील हितेश शंकर पाटील आणि रोहित निंबा घोरपडे हे (एम एच 18 सीबी 3607) या दुचाकी वर बसून धुळ्याकडून आर्वीकडे जात होते. यावेळी लळींग घाट संपल्यानंतर रोकडोबा हनुमान मंदिराच्या उतारावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांची मोटरसायकल अडवली. यानंतर त्यांना मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवत ७ लाखांची रोकड ठेवलेली कापडी पिशवी आणि मोबाईल घेऊन पसार झाले. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मुंबई – आग्रा महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. Dhule News
पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी महामार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला. यावेळी कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल शिंगणे या पथकाने सर्वात आधी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या गुन्ह्याची उकल झाली. पोलीस पथकाने उज्जैन फकीरा गायकवाड, दादू विठ्ठल सोनवणे, राहुल रमेश सूर्यवंशी, गोकुळ श्रावण अहिरे, बादल राजू मोरे, अनिल हिरामण सोनवणे, प्रकाश खंडू सोनवणे या सात जणांच्या टोळक्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ लाख ६१ हजारांची रोकड तसेच २५ हजार रुपये किमतींचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या गुन्ह्यातील एक आरोपी अद्यापही फरार असून त्याला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचप्रमाणे घटना झाली त्यावेळी पिस्तुलाचा वापर झाला किंवा काय ही बाब देखील तपासली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली.
हेही वाचा