धुळे : विमा कंपनीच्या मनमानी विरोधात निवेदन; ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा | पुढारी

धुळे : विमा कंपनीच्या मनमानी विरोधात निवेदन; ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा-शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक विमा काढलेला असून दुष्काळ भरपाई म्हणून काही रक्कम विमा कंपनीकडून अग्रीम म्हणून देण्यात आली आहे. मात्र, विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा न करता कर्जखात्यात जमा केली आहे. यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते मंगेश नेरे यांनी सदर विमा कंपनीच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांनी विमा काढताना ज्या राष्ट्रीय कृत बँकेचे खाते क्रमांक दिले होते, त्यावरच संबधित पीक विमा अग्रीम जमा होणे अपेक्षित होते. परंतु एचडीएफसी ऍग्रो इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या अन्य खात्यात रक्कम जमा केली. यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली असून शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांनी दिलेल्या खात्यावरच जमा करण्यात यावी, यावर आठ दिवसांत तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांसह विमा कंपनीच्या दारात ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा मंगेश नेरे यांनी दिला आहे.

निवेदन देतेवेळी पं.स.सदस्य बाळूशेठ टाटीया, योगेश तोरवणे, सचिन सोनवणे, पप्पू पवार, दत्ता पवार, साहेबराव भोये व शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी रुपेश दीक्षित यांच्याशी मंगेश नेरे यांनी फोन वर चर्चा केली असता त्यांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासित केले असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button