धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ | पुढारी

धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

धुळे ; पुढारी वृत्तसेवा-विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास निश्चित मदत होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ आज धुळे महानगरपालिका आवारात खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बालविकास सभापती संजीवनी सिसोदे, उपमहापौर वैशाली वराडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, महापालिका अतिरिकत आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त पल्लवी शिरसाठ, संगीता नांदुरकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, गजेंद्र अंपळकर यांच्यासह नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉ.भामरे म्हणाले की, भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करतांना केंद्र सरकार गरिबांच्या प्रती समर्पित राहील. त्यानुसार समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी जवळपास 70 हून अधिक योजना केद्र शासनामार्फत राबविण्यात आल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यत पोहचविण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून 5 एलईडी व्हॅनमार्फत धुळे जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात ही व्हॅन जाणार आहे. आणि एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. ज्यांना अद्याप पर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांच्यापर्यंत विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या यात्रेचे जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगले नियोजन केले असून ही व्हॅन जेव्हा आपल्या गावात पोहचेल तेव्हा तेथील लोकप्रतिनिधींनी यात सहभाग नोंदवुन नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेतंर्गत आपल्या जिल्ह्याला 5 एलईडी व्हॅन मिळाल्या असून प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारी, 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन जाणार आहेत. तसेच ज्या गावाची लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी एका दिवशी एक गाव असे नियोजन प्रशासनामार्फत केले आहे. अनेक शासकीय योजना या बहुतेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या योजनांची माहिती तळागाळापर्यंत, वंचित व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा उद्देश हा विकसित भारत संकल्प यात्रेचा आहे. ग्रामीण/शहरी/नगरपालिकास्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा हेतू आहे. शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देता येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तर आभार प्रदर्शन महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाहिदअली यांनी केले. यावेळी मान्यवराच्या हस्ते कुमारी समृद्धी चौधरी हीस आयुष्मान भारत कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.

अशी आहे विकसित भारत संकल्प यात्रा

विविध योजनेतंर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद-वैयक्तिक यशकथा/ अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत.

या विकसित भारत संकल्प यात्रेत आयुष्मान भारत योजना, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल, जल जीवन मिशन, स्वामित्व योजना, जनधन योजना, जीवन ज्योती योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणव, नॅनो फट्रीलायझर, तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रात सिकलसेल अभियान, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शल स्कुल, शिष्यवृत्ती योजना, वनहक्क दावे, वन धन विकास केंद्र योजना आदि योजनांची ग्रामीण भागात माहिती दिली जाणार आहे.

तर शहरी भागात पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा योजना, स्टाटअप इंडिया, आयुष्मान भारत, पीएम आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, पीएम ई-बस सेवा, सौभाग्य योजना, उजाला योजना, पीएम भारत जन औषध परियोजना, डिजिटल पेमेंट, खेलो इंडिया, वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत स्टेशन योजना आदि योजनांची माहिती या एलईडी व्हॅन मार्फत माहिती दिली जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button