मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त : अनिल गोटे

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त : अनिल गोटे
Published on
Updated on

धुळे; पुढारी वृत्तसेवा :  सत्तारूढ पक्षाचेच नेते मराठा आणि कुणबी असा निरर्थक वाद उपस्थित करून मराठ्यांना ठरवून भडकवत आहेत की काय? असेच वातावरण राज्यात सर्वदूर पसरले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे- पाटलांसारखा सर्वसामान्य माणूस प्राण पणाला लावून बसला आहे. सरकारला हा प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा वेळ नाही, पण यांना 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी वेळ आहे, अशी टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली.

धुळ्यात आज मराठा समाजाच्या आंदोलनाला लोकसंग्राम पक्षाच्या वतीने माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या समर्थकांसह पाठिंबा दर्शवला. तत्पूर्वी पत्रकारांसमवेत संवाद साधत असताना त्यांनी राज्यातील आघाडीच्या तीन्ही पक्षांवर सडकून टीका केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्याला येऊन गेले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात आणून द्यायला हवी होती. तसे झाले नाही. तसेच पंतप्रधान मोदी यांनी जातेवेळी शरद पवारांनी काय केले ? असा अवमान जनक प्रश्न विचारला, असे खडे बोल देखील त्यांनी यावेळी सुनावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सरकार घोषणाबहाद्दर आणि लाभार्थींचे सरकार आहे. कोणताही प्रश्न न सोडवता नुसत्या थापा मारून आलेली वेळ पुढे ढकलायची अशा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वभावामुळे मराठा समाजाचे नेते जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहे. गरीब मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. हाडाच्या कार्यकर्त्याला नमवने सोपे नाही, याची जाणीव राज्यातील तीन पायाच्या सरकारला येऊ नये ,याचेच आश्चर्य वाटते, अशी टीका देखील गोटे यांनी केली.

दिवसागणिक जरांगे – पाटलांची प्रकृती ढासळत आहे. त्यांचे प्राण कसे वाचवायचे याची चिंता करण्याऐवजी सरकारची पोपटपंची सुरू आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना तीन महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो, असे आश्वासन देत होते. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन १६ महिने उलटले आहे. मग इतके दिवस तुम्ही काय करत होता, असा प्रश्नही आमदार गोटे यांनी यावेळी उपस्थित केला.

तब्बल १६ महिने म्हणजे ४८० दिवसात तुमचा अभ्यास पूर्ण होऊ शकला नाही का ? दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व विरोधकांमागे चौकशी लावण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा ,धनगर आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न ,राज्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात कशी करता येईल ,अशा ज्वलंत प्रश्नांच्या अभ्यासासाठी वेळेचा सदुपयोग केला असता तर जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले नसते. असेही आमदार गोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news