धुळे : जयहिंद हौसिंग सोसायटीत सत्तांतर, निवडणुकीत मतदारांचा सत्ताधारी गटाला हादरा | पुढारी

धुळे : जयहिंद हौसिंग सोसायटीत सत्तांतर, निवडणुकीत मतदारांचा सत्ताधारी गटाला हादरा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील नामांकित असणाऱ्या जयहिंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी गटाला हादरा दिला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी असणाऱ्या कै. नानासाहेब झेड बी पाटील जयहिंद पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या असून जयहिंद विकास सभासद पॅनलला १२ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीकडे जिल्हा भराचे लक्ष लागून होते.

धुळे जिल्ह्यातील जयहिंद शैक्षणिक संस्था ही महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ही संस्था वेगवेगळ्या कारणांमुळे वादांकित ठरली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष तथा सत्ताधारी गटाचे पॅनल प्रमुख डॉक्टर अरुण साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कै. नानासाहेब झेड बी पाटील जयहिंद पॅनल तर माजी अध्यक्ष विजय पितांबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद विकास सभासद पॅनल या दोघांमध्ये सरळ सरळ लढत झाली.

या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे डॉक्टर अरुण साळुंखे हे इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या जागेवर १४४ मते घेऊन विजयी झाले. तर त्यांच्या गटाच्या नीलिमा पाटील या महिला सर्वसाधारण गटातून १२१ मते मिळाली. तर सर्वसाधारण गटातून प्रमोद पाटील यांना ११७ मते मिळाली. या तीन जागा वगळता सत्ताधारी गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. माजी अध्यक्ष विजय पितांबर पाटील हे सर्वसाधारण गटातून सर्वाधिक १७६ मते घेऊन विजयी झाले असून त्यांच्या गटाचे राजन नथू पाटील १२२, अविनाश देवरे १५१, चंद्रशेखर इच्छाराम पाटील १५३, विश्वेश्वर दलपतराव देवरे १३३ ,विजय गुलाबराव बोरसे १२६ ,शरद शंकरराव बच्छाव १३१, भूषण शिवाजीराव सावंत १११, निलेश गुलाबराव पाटील ११९ मते मिळवून विजयी झाले. तर महिला राखीव जागेवर याच गटाच्या भारती भामरे या १३५ मते घेऊन विजयी झाल्या. तर राखीव प्रवर्गाच्या जागेवर डॉक्टर नितीन काकडे १३४ व प्रा मोहन मोरे हे १२४ मते घेऊन विजयी झाले.

या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. तर विजयाची प्रतिक्रिया देताना पॅनल प्रमुख विजय पाटील यांनी सांगितले की, जयहिंद शैक्षणिक संस्थेची लौकिकता पूर्वीप्रमाणेच करण्यासाठी परिश्रम घेतले जातील. या शैक्षणिक संस्थेमधून गुणवंत विद्यार्थी घडवण्याची निरंतर प्रक्रिया सुरू राहील. त्याकडे प्रकर्षाने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button