पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
वन हक्क कायदा व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक कष्टकरी महिला सभा व लोक संघर्ष मोर्चातर्फे येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जुन्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी प्रभारी तहसीलदार आशा गांगुर्डे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी मोर्चेकरुंशी चर्चा केली. परंतु प्रांताधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भुमिका घेण्यात आली. दोन ते अडीच तास आंदोलन सुरु होते. अखेर प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे या पोहोचल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आल्या व वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर तहसीलदार यांच्या दालनात मागण्यांबाबत शिष्टमंडळाशी उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे डोंगर बागुल, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी वन हक्क कायदा व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीविषयी चर्चा करतांना साक्री तालुक्यातील गहाळ झालेले प्रकरणातील विषय मांडले. यावेळी प्रांताधिकारी धोडमिसे यांनी संबंधित प्रकरणातील माहिती मागवत कार्यवाहीचे आश्वासन दिले. परंतु इतर विषयांवर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात, प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यातील वन जमीन धारक पिढ्यानपिढ्या जमीन कसत आहेत. परंतु वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या वेळी मूळ हेतुलाच हरताळ फासला गेला आहे. तरी वन हक्क कायद्यानुसार प्रलंबित दावे तात्काळ सुनावणी घेवून मंजूर करावेत, ज्या दावेदारांचे दावे मंजूर आहेत त्यांना प्रमाणपत्र न देता सातबारा उतारा देण्यात यावा, सर्व मंजूर दावेदारांना बिनव्याजी पीक कर्ज देण्यात यावे, विविध कार्यकारी सोसायटीत सर्व मंजूर दावेदारांना सभासद करून घेण्यात यावेत, वन उपलब्ध असलेल्या गावांना सामुदायिक वन अधिकारी देण्यात यावे यासह इतर मागण्यांच्या निवेदनात समावेश आहे.
निवेदनावर डोंगर बागुल, प्रतिभा शिंदे, अशोक सोनवणे, मनोज देसाई, देवचंद सोनवणे, अण्णा पवार, भटू गायकवाड, परशुराम मालुसरे, सकाराम बागुल, भरत शिंदे, भिका पवार, संजू ठाकरे, रान्या कुवर, हरीश देसाई, लहू गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलन दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, संजय शिरसाठ यांनी पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा :