

धुळे पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलाखाली झालेल्या भिक्षेकरीच्या खूनातील मारेकऱ्यास मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गजाआड केले आहे.
मोहाडी गावाकडे जाणा-या उड्डाण पुलाखाली यशवंत कृषी विद्यालयाच्या भिंतीला लागून सर्व्हीस रोडवर अनोळखी असणाऱ्या वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील इसमाचा चेहरा दगडाने ठेचून त्यास जिवे ठार केल्याची बाब निदर्शनास आली. यासंदर्भात चाळीसगांव रोड पोलिस स्टेशनला भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगांव रोड पोलिस स्टेशनचे व मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक करीत होते.
यात मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली. मयत अनोळखी भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा अनोळखी इसमाशी मोहाडी गावातील संजय पखाले यांच्यात मागील २ ते ४ दिवसापूर्वी भांडण झाल्याची माहीती समजली. त्यानंतर तपास पथक मोहाडी गावात संशयित संजय पखाल यांची माहीती घेणेकामी गेले असता संजय पखाले हा गुन्हा घडल्यापासून घरी आला नसल्याचे निष्पन्न झाल्याने पथकास संशय बळावला.
पथक संजय पखाले यांच्या नातेवाईकाकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता त्याचा मुलगा प्रतिक पखाले उर्फ गुड्डू हा देखील पथक पाहुन पळून गेला. त्यानंतर पथकाचा पक्का संशय बळावल्याने त्यांनी प्रतिक पखाले याची माहीती घेतली असता तो त्याच्या घरी मिळून आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेवून विचारपूस केली. सदर गुन्हयात तो त्याचे वडील संजय वसंत पखाले व त्यांचा साथीदार आकाश उर्फ गुरु जगन्नाथ बोरसे सर्व रा. मोहाडी यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.