

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मिरचीची पूड डोळ्यात फेकून व्यापाऱ्याचे 24 लाख रुपये लांबवल्याची घटना धुळ्यात घडली आहे. या चोरट्याने व्यापाऱ्याची दुचाकी देखील लांबवली असून पोलीस पथकाने आता चोरट्यांना शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निरामय रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या असलेल्या माधव कॉलनी परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. या परिसरात परेश पटेल हे त्यांच्या दुचाकीने 24 लाख रुपयांची रोकड घेऊन घरी परत जात होते. यावेळी अचानक त्यांच्यासमोर मोटारसायकलवरून चौघे चोरटे आले. या चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. यानंतर उर्वरित चोरट्यांनी त्यांच्याशी झटापट करून त्यांच्याजवळील पैसे असलेली बॅग लांबवली.
ही घटना घडताच पटेल यांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना कळताच घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी रेड्डी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले. त्यानंतर तातडीने या परिसरामध्ये पोलिसांनी गस्ती पथकांना अलर्ट करण्यात आले.
या पथकाने महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तातडीने तपासणी सुरू केली. तसेच चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, उशिरापर्यंत या चोरट्यांचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच या भागातील मोबाईल लोकेशन देखील तपासण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात चौघा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?