पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन टी-२० विश्वचषक २०२२ चा 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' ठरला आहे. (T20 World Cup) सॅम करनने या विश्वचषकात त्याने १३ विकेट्स पटकावल्या आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने भेदक मारा केला. अंतिम सामन्यात त्याने ४ षटकांमध्ये केवळ १२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या सॅम करनने अफगाणिस्तानविरूद्ध १० धावा देत ५ विकेट्स पटकावल्या होत्या. मात्र भारताविरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये त्याची पाटी काेरी राहिली होती. मात्र, आज पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्याच्या अचूक मार्यामुळे पाकिस्तान केवळ १३७ धावांपर्यंत मजल गाठू शकला. (T20 World Cup)
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि ५ विकेट्स राखून विजेतेपद पटकावले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने इंग्लंडसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लडने बेन स्टोक्सच्या झुंझार अर्धशतकाच्या (नाबाद ५२) जोरावर १९ षटकांमध्ये ५ गडी गमावून १३८ धावांचे लक्ष्य गाठले. याचबरोबर इंग्लंडचा संघ टी २० क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा दुहेरी विश्वविजेता ठरला आहे. (T20 World Cup)