

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय जंत दिनानिमित्त सोमवारी (दि.25) शहरात 1 ते 19 वयोगटातील सुमारे अडीच लाख बालके, तरुणांना जंतनाशक गोळी वाटपाची मोहीम घेण्यात येईल. तसेच 29 तारखेला मॉप अप दिन पाळला जाईल, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
1 ते 19 वर्षे वयोगटातील किमान 28 टक्के जणांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमिदोष हा मातीतून प्रसारित होणार्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे आहे. कृमिदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. तसेच बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेता, या वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल. याद्वारे त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे, हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. ही मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
शहरात 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींची संख्या 2 लाख 56 हजार 258 असून, त्यांना सोमवारी (दि.24) जंतनाशक गोळ्यांचे वाटप होईल. मोहिमेतून सुटणार्या लाभार्थ्यांना 29 एप्रिलला गोळ्यांचे वितरण केले जाईल. शाळेत न जाणार्या मुलांना मनपाकडून आशासेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे.
दुष्परिणाम नाही
एक ते दोन वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी 200 मिलीग्रॅमची गोळी चुरा/पावडर करूनच पाण्याबरोबर देण्यात येईल. 2 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना 400 मिलीग्रॅमची गोळी चुरा अथवा तुकडे करून चावून खाण्यास देण्यात येईल. अल्बेंडेझॉलची गोळी उपाशीपोटी देता येत नाही. गोळी खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि, जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचितच मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असून, पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मनपा वैद्यकीय विभागाने केले आहे.