Robbery : सराफ व्यावसायिकावर भरदिवसा दरोडा; नऊ लाखांचा ऐवज लंपास

Robbery : सराफ व्यावसायिकावर भरदिवसा दरोडा; नऊ लाखांचा ऐवज लंपास

जळगाव; वृत्तसेवा : एरंडोल शहरातील सराफ व्यापाऱ्याला घरी जात असताना रस्त्यातच गाठत अज्ञात तीन दरोडेखोरांनी (Robbery) बंदुकीचा धाक दाखवत 150 ग्रॅम सोन्याच्या दागिण्यांसह चार किलो चांदी, दुचाकी व मोबाईल मिळून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लांबविल्याची  घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात तीन तरुणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील सराफ व्यावसायिक राजेंद्र बबनशेठ विसपुते ( रा. माळपिंप्री) यांचे एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे सराफाचे दुकान आहे. सकाळी ९ वाजता दुकान उघडल्यानंतर दुपारी २ वाजता ते दुकान बंद करून मूळ गावी माळपिंप्री येथे जातात. त्यानुसार आज बुधवारी ( दि.१६ ) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर लक्ष ठेवून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील अज्ञात दरोडेखोर (Robbery) दोन दुचाकींवर आले. चोरटक्के गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर राजेंद्र विसपुते यांच्या दुचाकीपुढे त्यांची दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही. 0428) लावून अडवत काही कळण्याच्या आत विसपुते यांच्यावर बंदुक (pistal) रोखली तर दुसर्‍याने डाव्या हाताच्या खांद्यावर चाकूने हल्ला चढवला तर तिसर्‍याने दुचाकीला लावलेली ऐवज असलेली बॅग हिसकावली. या बॅगेत 150 ग्रॅम सोन्याच्या दागिण्यांसह चार किलो चांदी व मोबाईल असा मुद्देमाल लांबवला. लूट झाल्यानंतर चोरट्यांकडील दुचाकी जागेवरच बिघडल्याने चक्क चोरट्यांनी विसपुते यांची दुचाकी हिसकावून त्याद्वारे पळ काढला.

या प्रकारानंतर विसपुते यांनी एरंडोल पोलिसात धाव घेत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे आपबिती कथन केल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी एरंडोल पोलीस ठाण्याला भेट देत घटना जाणून घेत तपासाबाबत मार्गदर्शन केले. याप्रकरणी अज्ञात तीन दरोडेखोरांना एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऊ लाखांच्या ऐवजावर डल्ला (Robbery)

सराफ व्यावसायिक विसपुते यांच्याकडील बॅगेत 150 ग्रॅम वजनाचे व सहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तर दोन लाख रुपयांची चार किलो चांदी, 52 हजारांची रोकड तसेच 10 हजारांचा मोबाईल तसेच दुचाकी (एम.एच.19 सी.बी.9781) मिळून आठ लाख 87 हजारांचा ऐवज होता.

चोरट्यांची दुचाकी पडली बंद

लुटारूंनी लूट करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे काळ्या कापडाने बांधून झाकल्याने त्यांची ओळख पटली नसली तरी लूट झाल्यानंतर चोरट्यांकडील शाईन दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही.0428) जागेवरच बिघडल्याने त्यांची पंचाईत झाली. मात्र, चोरट्यांनी विसपुते यांची दुचाकी हिसकावून त्याद्वारे पळ काढला. या प्रकारानंतर विसपुते यांनी रस्त्यावरून जाणार्‍या इसमाला थांबवत त्याच्या मोबाईलवरून भावाशी संपर्क साधला व नंतर एरंडोल पोलिसात धाव घेत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे आपबिती कथन केल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळावरून चोरट्यांची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याद्वारे चोरट्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news