

नगर: जिल्हा परिषदेमध्ये काल दुपारी तांत्रिक कारणांमुळे तब्बल साडेतीन तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने कर्मचारी व नागरीकही घामाघूम झाल्याचे दिसले. एक मोठे जनरेटर काही वर्षापासून बंदच आहे, सोलर सिस्टीमही जुनाट झाली आहे, त्यातही वीज साठवण होत नाही, त्यामुळे आजमितीला केवळ एका छोट्या जनरेटवर ‘मिनी मंत्रालय’ सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र पुढे येत आहे. या निमित्ताने प्रशासकीय इमारतीत वीज गायब झाल्यानंतर कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याचे विदारक सत्यही समोर आले.
याचे झाले असे की, काल सोमवारी दुपारी 1.00 ते साधारणतः 4.00 या कालावधीत प्रशासकीय इमारतीमध्ये वीज नसल्याने पंखे बंद होते. काही कार्यालयात संगणक प्रणालीही बंद असल्याने कामकाजही ठप्प असल्याचे दिसले. यावेळी वेगवेगळया कामांसाठी जिल्हा परिषदेत आलेले नागरीक देखील हातातील रुमालाने हवा घेताना दिसले. तर महिला कर्मचाऱ्यांनी कागदी पंखे बनवून, तर पुरुषांनी समोरची फाईल हातात घेऊन त्याचा हवा घेण्यासाठी आधार घेतल्याचे पहायला मिळाले. तब्बल तीन तास ही परिस्थिती कायम दिसली.
दरम्यान, वीज पुरवठा बंद झाल्यानंतर प्रशासनाकडे कोणतीही ठोस उपाययोजना नाही. 200 कि.वॅटचे एक जनरेटर आहे, मात्र तेही बंद पडलेले आहे. त्याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. किंवा नवीन घेण्याची तरतूदही केलेली नाही. सध्या 7.5 कि.वॅटचे एकच छोटे जनरेटवर झेडपीची धुरा आहे. मात्र, यातूनही फक्त सीईओंच्या मिटींगहॉलमध्येच वीज पुरवठा शक्य आहे. सोलर पॅनलही मर्यादीत आहे.
त्यांच्याकडून 40 कि.वॅट एवढीच उर्जा निर्मिती केली जाते. यातून वीज बील बचत होत असली तरी वीजेच्या स्टोअरेजची व्यवस्था नसल्याने ही किती कामाचे आहे, यावर प्रश्चचिन्ह आहे. एक्सप्रेस फिडरही अजुन कागदावरच आहे. यावर अनेकदा लक्ष वेधले गेले. त्यावर आतापर्यंत कोट्यवधीचा खर्च झालेला आहे. मात्र, या कामात कायदेशीर अडचण आल्याने त्यावर उपाययोजना निघालेल्या नाहीत किंवा पर्यायी व्यवस्थाही देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
एकीकडे इमारत देखभाल दुरुस्ती, रंगरंगोटी, निवासस्थाने इत्यादी गोष्टींवर मोठा खर्च केला जात असताना, 14 विभागांचाच नव्हे तर जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या मिनी मंत्रालयात वीज गायब झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था देण्यासाठी ‘तरतूद’ नसणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया काल अभ्यांगतांनी ‘दै.पुढारी’शी बोलताना दिल्या. याकडे सीईओ आनंद भंडारी तसेच अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.