

संदीप रोडे
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विश्वासू आणि विद्यमान आमदार असतानाही पक्षाने 1985 मध्ये शंकरराव कोल्हे यांना थांबविले होते. पक्षनिष्ठेला प्राधान्य देत कोल्हे थांबले अन् 1990 पुन्हा आमदार होऊन मंत्रीही झाल्याचा इतिहास.
याच इतिहासाची पुनरावृत्ती 40 वर्षानंतर नातवाच्या रूपाने पाहावयास मिळाली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री आणि पक्षनिष्ठा अशा दुहेरी पेचात सापडलेल्या कोल्हे कुटुंबाने ‘त्यागाचा विवेकी’ निर्णय घेतल्याचे आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्याच त्यागातून ‘देव’ पावला अन् आमदारकीचा ‘योग’ जुळला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
राजकरणातील मुरब्बी सहकाराचे जाणते नेते स्व. शंकरराव कोल्हे यांचे विवेक कोल्हे हे नातू 1972 ते 1985 पर्यंत अन् पुढे 1990 ते 1999 पर्यंत शंकरराव कोल्हे आमदार राहिल्याचा इतिहास. दोन टर्म आमदारकीने हुलकावणी दिलेल्या कोल्हे कुटुंबाला 2014 मध्ये स्नेहलता कोल्हेंच्या रूपाने संधी मिळाली, त्याचबरोबर कोपरगावात पहिल्यादांच ‘कमळ’ही फुलले. 2019 ला निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या कोल्हे कुटुंबाने ‘विवेकी’ राजकीय चाल खेळण्यास प्रारंभ केला. साखर कारखान्याची सूत्रे हाती घेत अध्यक्षपदापासून श्रीगणेशा केलेले विवेक कोल्हे जिल्हा बँकेचे संचालकही झाले.
शिक्षक मतदारसंघात पहिलाच ‘अपक्ष’ प्रयोग केला, मात्र पदरी निराशा पडली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप महायुती म्हणून सामोरे गेल्याने कोल्हे यांची कोंडी झाली. विजयाची खात्री असतानाही पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेल्या विवेक कोल्हे यांच्या निर्णयावेळी स्व. कोल्हे यांच्या त्यागाची आठवण ‘पुढारी’ने ऑक्टोबर 2024 मध्ये करून दिली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या शब्दाखातर कोल्हेंनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देत ‘त्याग’ करण्याचा ‘विवेकी’ निर्णय घेतला. स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ‘त्याग आणि योग’चे ‘पुढारी’चे 2024 मधील वृत्त आज तंतोतंत खरे ठरले.
धूर्तपणे जिंकला आमदारकीचा पट
अत्यंत शांत, सयंमी, राजकारणात तोलून मापून बोलणारे पण तितकेच आक्रमक अशी विवेक कोल्हे यांची ओळख. सहकारात ‘वेगळे प्रयोग’ करणारे विवेक कोल्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मध्ये कधी गेले याचा थांगपत्ता भल्याभल्यांनाही लागला नाही. विवेक यांच्या राजकीय वाटेत अनेक स्पीडब्रेकर आले; पण न डगमगता तितक्याच कौशल्याने ते पारही केले. नगरपालिका निवडणुकीत तर कोपरगावचे राजकारण ‘काका-आका’ अन् ‘मामा’ शब्दप्रयोगांनी गाजले. तरुण आणि ज्येष्ठांची कधी आक्रमकता तर कधी संयम असा संगमही कोपरगावात पाहावयास मिळाला. नगरपालिका निवडणुकीपासून अत्यंत धूर्तपणे राजकीय सोंगट्या टाकणाऱ्या कोल्हे कुटुंबाने ‘आमदारकीचा’ पट शेवटी जिंकलाच!