

नगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महायुतीच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे लढविणार आहोत. स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार असल्याचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, मराठी भाषा संवर्धनासाठी आता अखिल भारतीय स्तरावर बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)
उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, सर्वच पक्षांना पक्ष वाढविण्याचा अधिकारी आहे. आम्ही देखील यामध्ये यशस्वी होऊ. नगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार नाही.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. महायुती म्हणूनच आम्ही एकत्रित निवडणुका लढवणार असून, महायुतीच्या झेड्याखालीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच जागा जिंकणार आहोत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी म्हटले.
मंत्री सामंत म्हणाले, मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेल्या शंकांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील चर्चा करतील आणि त्यातून निश्चित त्यांच्या शंका-कुशंका दूर केल्या जातील.
मराठा आरक्षणासाठी विखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, तसेच ओबीसी आरक्षणासाठी महसूलल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती कार्यरत आहे. दोन्ही समित्यांचे अध्यक्ष आपापसांत संपर्कात राहून आरक्षणासंदर्भातील प्रश्न सोडवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, संभाजी कदम, सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा करणार
नगर-मनमाड महामार्गाबाबत पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्याशी चर्चा करून या महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. भविष्यात या प्रकरणी अहिल्यानगरकरांना आंदोलन करावे लागणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान दाखल गुन्ह्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता आंदोलनाशी संबंधित प्रकरणे मागे घेण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.