आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या फेरबदलानंतर नवी प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आली. त्यांचा फटका अनेकांना बसला. त्यातून शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडेही (भाऊ) सुटले नाहीत. भाजपसाठी अनुकूल असलेल्या या वार्डातून बोरुडे यांना ‘बाण’ म्यान करण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही.
भाजपसाठी ही ‘अधिक’ची तर शिंदेंच्या शिवसेनेसाठी ‘उणे’ बाजी ठरू पाहत आहे. भाजपकडे अनेक इच्छुक असले तरी राष्ट्रवादीकडूनही काहींनी तयारी चालविली आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह सावेडी मंडलाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ राजेंद्र काळेंसारखे मातब्बर भाजपचे नेते याच वार्डात असल्याने निवडणुकीत रंग भरण्याअगोदरच उमेदवारीसाठी चढाओढ होण्याची चिन्हे आहेत. (Latest Ahilyanagar News)
माजी महापौर बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, पल्लवी जाधव आणि वंदना ताठे हे भाजपचे चार नगरसेवक (जुना सहा) सात वार्डाचे नगरसेवक आहेत. वेदांतनगर, रासनेनगर, अमित बँक कॉलनी, प्रेमदान हडकोचा भाग तोडल्यानंतर कॉटेज कॉर्नर आणि कवडेनगर, जाधव मळा, बोरूडे मळा हा नवा भाग जोडून नव्याने सात नंबर प्रभागाची निर्मिती झाली.
हक्काचे मतदार गेले तरी प्रभागात भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच या वार्डावरच भाजपची मदार असणार आहेे. गत पंचवार्षिकला भाजपच्या आरती बुगे याचां पराभव करत शिवसेनेच्या सारिका हनुमंत भुतकर आश्चर्यकारकरित्या विजयी झाल्या होत्या. जातपडताळणी प्रमाणपत्राचे शुक्लकाष्ठ मागे लागल्याने त्या अपात्र झाल्या. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत पल्लवी जाधव यांनी विजयश्री मिळवत भाजपचा झेंडा उंचावला होता.
नव्या प्रभाग रचनेत माजी उपमहापौर पुष्पा अनिल बोरुडे यांच्या वार्डाची विभागणी झाली आहे. त्यामुळे त्यांना सात नंबर हाच वार्ड सुरक्षित मानला जातो. मात्र येथील भाजपचे प्राबल्य पाहता त्यांच्यावर शिवसेनेचा बाण म्यान करण्याची वेळ आली आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि अनिल बोरुडे यांची गुप्त बैठक झाली असून दोघांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा जोर धरत आहे.
अनिल बोरुडे हे भाजपात प्रवेश करून उमेदवारी घेतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. तसे झाले तर बाबासाहेब वाकळे आणि अनिल बोरुडे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र अन्य दोन जागांवर कोण? हा प्रश्न उरतो. या भागाची लोकसंख्या पाहता अनुसूचित जमातीचे आरक्षण पडण्याची शक्यता पाहता उमेदवारी देताना भाजपला तारेवरची कसरत करत नाराजी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, ज्ञानेश्वर काळे, वंदना ताठे हे भाजपकडून उमेदवारीचे दावेदार मानले जातात. संघाच्या मुशीत तयार झालेले रवींद्र बारस्कर यांचा स्वभाव आणि कामकाजाची पद्धत पाहता वार्डात ‘मिस्टर क्लिन’ अशी त्यांची प्रतिमा आहे.
भाजपांतर्गत गटातटाच्या राजकारणात गतपंचवार्षिकला मनीषा ज्ञानेश्वर काळे/बारस्कर यांची उमेदवारी ऐनवेळी डावलण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली, पण त्यांना यश मिळाले नाही. आता ज्ञानेश्वर काळे हे सावेडी मंडलाचे अध्यक्ष आहेत. शहरातील चार मंडलापैंकी सावेडी मंडल वेगवेगळ्या उपक्रमामुळे कायम चर्चेत राहिले. त्यामुळे काळे हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यांना मात्र जाग एक आणि दावेदार तीन अशा पेचात भाजप सापडण्याची शक्यता आहे. आरक्षित जागेवर मात्र नवखा उमेदवार द्यावा लागेल.
शिवसेनेची मोर्चेबांधणी!
स्व. अनिल राठोड यांचे एकेकाळचे निष्ठावंत समर्थक रवींद्र वाकळे यांचाही या वार्डात मोठा जनसंपर्क आहे. मात्र त्यांचे नाव चर्चेच्या अग्रस्थानी नसल्याचे पदोपदी जाणवते. वाकळे यांना ताकद देत उबाठा शिवसेनेचा पॅनल करून मैदानात शड्डू ठोकेल, असे चित्र आहे. गतवेळी बसपा आणि मनसेनेही या वार्डातून नशीब अजावले होते.
आता कोण कोणत्या पक्षाकडून मैदानात उडी घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडूनही काही तरुणांनी फिल्डिग लावली आहे. त्यामुळे भाजपसाठी हक्काचा समजल्या जाणाऱ्या वार्डात शिंदे सेनेला महत्त्व आले तर नवल वाटू नये.मैत्रीपर्व आणि सामंजस्य!
एकीकडे भाजपची बाजू भक्कम असली तरी राष्ट्रवादीकडूनही चाचपणी सुरू आहे. माजी नगरसेवक दगडूमामा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. याशिवाय राष्ट्रवादीकडे अनेक नव्या चेहऱ्यांनी धाव घेतल्याची चर्चा आहे.
त्यामुळे जागावाटपाचा पेच आणि उमेदवारी देताना करावी लागणारी संभाव्य कसरत भाजपसमोरचे मोठे आव्हान असणार आहे. अर्थात ‘मैत्रीपर्व’ यातून तोडगा काढतील. ते म्हणतील तेच होईल, असाही मानणारा इच्छुकांचा एक वेगळाच वर्ग आहे. त्यामुळे भाजपच्या वार्डात उमेदवारी देताना राष्ट्रवादीची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असणार आहे.