

पाथर्डी: तिसगावमधील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न चिघळतच चालला असून पाणीपुरवठा समितीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देत तिसगावच्या महिलांनी गुरुवारी (दि. 26) पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.
गुरुवारी सकाळी तिसगावमधील शबाना पठाण, आग्नेश राजू साळवे, शांताबाई ससाणे, शैनाज कुरेशी, हसीना कुरेशी, मुसराज कुरेशी, रिजवाना शेख, रेशमा पठाण, शौकतभाई पठाण, प्रदीप ससाणे, खुर्शीद शेख, सुनील उमाप, मन्सूर नालबंद, लियाकत शेख, सिद्धिक पठाण, सिराज पठाण, गुलजार पठाण, शमा शेख, हबीबा शेख यांच्यासह अनेक महिला व पुरुष पंचायत समिती कार्यालयात जमा झाले होते.महिलांच्या हातात रिकामे हंडे होते. (Latest Ahilyanagar News)
शबाना पठाण म्हणाल्या, गेल्या 26 वर्षांपासून मी तिसगावमध्ये राहत असून, कधीही आठ दिवसांच्या आत पाणी मिळालं नाही. सध्या तर दीड दीड महिन्यांनी पाणी मिळते. काहीही करा, पण आम्हाला पाणी द्या. आमच्या ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपोषणाची तातडीने दखल घ्या.
प्रदीप ससाणे म्हणाले, तिसगावकर गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत, पण प्रशासन कोणतीच दखल घेत नाही. गाव बंद करूनही काही फरक पडणार नाही, म्हणूनच आम्ही या आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी पाणीप्रश्नावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र, पाणीप्रश्न कायम राहिल्यास पुढील लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.