

नगर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणार्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने 250 जादा बसची व्यवस्था केली आहे. तारकपूर बसस्थानकातून 2 जुलैपासून जादा बस पंढरपूरसाठी धावणार आहेत. प्रवाशासाठी महामंडळाने ज्या सवलती दिलेल्या आहेत. त्या सर्व सवलती या जादा बसलादेखील लागू असणार आहेत. दरम्यान, सध्या दररोज दहा ते बारा बस पंढरपूर वारीसाठी सुरू आहेत.
6 जुलैला आषाढी एकादश आहे. यानिमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून भाविक जात आहेत. या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीने 250 जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. (Latest Ahilyanagar News)
त्यासाठी आगारनिहाय बसची व्यवस्था केली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, नेवासा आदी आगारांच्या बस तारकपूर बसस्थानकामार्गे पंढरपूरला जाणार आहेत. तारकपूर आगारातून 40 जादा बसचे नियोजन आहे. याशिवाय धुळे आणि जळगाव येथून येणार्या बसदेखील तारकपूरमार्गे पंढरपूरला रवाना होणार आहेत.
अहिल्यानगर येथील तारकपूर बसस्थानकातून पंढरपूर वारीसाठी जादा बस सुटणार आहेत. या ठिकाणाहून 24 तास बस सोडण्याचे नियोजन असून, 2 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. पंढरपूर वारीसाठी 10 जुलैपर्यंत बस धावणार आहेत. दर्शन आटोपल्यानंतर पंढरपूर येथील विठठल साखर कारखान्यावरुन परतीसाठी बसचे नियोजन करण्यात आले आहे.
...तर थेट गावातून बसची व्यवस्था
पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे 44 भाविक एकाच गावातील असल्यास आणि त्यांनी मागणी केल्यास बस थेट त्या गावात पाठवली जाणार आहे. या भाविकांना पंढरपूर नेणे आणि दर्शन आटोपल्यानंतर थेट घरी सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असणार आहे. यासाठी प्रवाशांना नेहमीप्रमाणे तिकिट दरात ज्या सवलती दिल्या आहेत. त्या सर्व लागू असणार आहेत. गावासाठी स्पेशल बस हवी असल्यास एसटी आगार प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन एस.टी. विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.