

रियाज देशमुख
राहुरी: थोडं थांबा, राहुरीला लवकरच गोड बातमी मिळेल असे वक्तव्य पुतणे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आणि ती गोड बातमी देण्याचे काम काका तथा तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी दिली.
राज्यातील पवार काका-पुतण्याप्रमाणेच राहुरीतही तनपुरे काका-पुतणे आता वेगवेगळ्या पक्षात असल्याने तनपुरे समर्थकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. माजी मंत्री तनपुरे यांची भूमिका उघड नसताना कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे हे लवकरच शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Ahilyanagar News)
राज्यात घडत असलेल्या अनेक पक्षप्रवेशाच्या बातम्या पाहता आता राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. याप्रमाणे राहुरीतही अपेक्षित असलेली पक्षप्रवेशाची बातमी अनपेक्षितरित्या आली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.
त्या आशयाचा संवादही माजी मंत्री तनपुरे यांनी कारखाना निवडणुकीवेळी केला होता. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या चर्चेतही राजकारण काहीही घडू शकते, असे सांगत प्राजक्त तनपुरे यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला फोडणी दिली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीला दांडी मारलेले प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या जिल्हा दौर्यात सहभागी झाले.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच तनपुरे कुटुंबीय राहणार असे दिसत असतानाच अनपेक्षितरित्या काका अरुण तनपुरे व त्यांचे सुपुत्र हर्ष तनपुरे या दोघांनीच मुंबई येथे देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कार्यक्रम आटोपला.
अखेर अरुण तनपुरे यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेशाची बातमी पाहून तनपुरे समर्थकांना काय करावे व काय बोलावे हेच समजेनासे झाले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पक्षप्रवेश केला नसल्याने त्यांची भूमिका काय? हा प्रश्न सर्व तनपुरे समर्थकांना निर्माण झालेला आहे. अरुण तनपुरे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसला तुतारी चिन्ह लावत आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दर्शविले.
परंतु 20 मिनिटांतच प्राजक्त तनपुरे यांचे स्टेटस गायब झाल्याचे दिसले. परिणामी प्राजक्त तनपुरे यांच्या मनात नेमके काय? हा प्रश्न तनपुरे समर्थकांपुढे निर्माण झालेला आहे. आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे.
निवडणुकीसाठी तनपुरे गटाला तनपुरे कारखाना विजयाचे टॉनिक मिळाले होते. विधानसभा पराभवानंतर तनपुरे गटाला संजीवनी मिळाली होती. परंतु सद्यःस्थितीला अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात असल्याने समर्थकांचा गोंधळ वाढलेला आहे.
लवकरच पुन्हा देवगिरी बंगल्यावर अरुण तनपुरे हे आपल्या हजारो समर्थकांचा पक्षप्रवेश सोहळा करणार असल्याचे आणि त्यासाठी बाजार समिती, तनपुरे कारखान्याच्या माध्यमातून तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. अरुण तनपुरे यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार राष्ट्रवादी गटाला मोठी ताकद मिळाली आहे. तनपुरे गट हा शरद पवार राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असल्याने राहुरी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद तोकडी ठरत होती. परंतु अरुण तनपुरे यांचा पक्षप्रवेश अजित पवार गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा पाठबळ देणारा ठरेल असे चित्र आहे.
त्या निष्ठावंतांची चुप्पी
तनपुरे कुटुंबीयांशी जवळीक ठेवत जुन्या जाणत्या नेत्यांनी जनसेवा मंडळाच्या माध्यमातून तनपुरे कुटुंबीयांशी नाळ जोडून ठेवली आहे. संबंधित निष्ठावंतांशी चर्चा केली असता तनपुरे कुटुंबीयांत दोन पक्ष झाल्याने त्यांनी ‘कोणतेही भाष्य करू शकत नाही’ असे सांगितले. आगामी काळात योग्य तो निर्णय होईल. जनसेवा मंडळाशी प्रामाणिक असल्याचे सांगत निष्ठावंतांनीही प्रतिक्रिया देताना संभ्रमावस्था दाखवून दिली.
..तर जयंत पाटील यांना धक्का
तनपुरे कुटुंबीय हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्तीय व नात्यातील आहे. जोपर्यंत जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या समवेत आहेत तोपर्यंत तनपुरे कुटुंबीय श.प.गटात कार्यरत राहणार असे बोलले जात होते. परंतु कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा पक्षप्रवेश सोहळा हा राहुरीच्या राजकारणात धक्कादायक ठरत असताना जयंत पाटील यांनाही धक्का मानला जात आहे.